भारतीय संशोधकांना जर्मनीत संधी

जर्मनीच्या विद्यापीठांमध्ये शिक्षण आणि संशोधनाची सुविधा, इच्छुकांनी लाभ घेण्याचे तज्ञांचे आवाहन

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारतीय संशोधकांना जर्मनीच्या विद्यापीठांमध्ये मोठी संधी उपलब्ध झाली आहे. भारतीय संशोधक आणि विद्यार्थ्यांनी तेथे यावे, यासाठी या विद्यापीठांनी विशेष योजनाही केल्या आहेत. जर्मनीत अनेक विश्वविख्यात विद्यापीठे असून त्यांच्यात अखंड विविध विषयांवरील संशोधनांच कार्य चालते. भारतीय विद्यार्थी आणि संशोधकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन अनेक तज्ञांनीही केले आहे.

भारतीय संशोधकांनी जर्मनीत यावे, म्हणून जर्मन प्रशासनाने काही विशेष योजना आणल्या आहेत. जे संशोधक, अतिथी शास्त्रज्ञ किंवा व्हिजिटींग तज्ञ यांना जर्मनीच्या शिक्षण संस्थांमध्ये आणि संशोधन संस्थांमध्ये काम करण्याची इच्छा आहे आणि जे यासाठी योजना सज्ज करीत आहेत, त्यांच्यासाठी जर्मन प्रशासनाने विशेष व्हिसाची योजना केली आहे. या व्हिसामुळे असे असामान्य प्रतिभेचे संशोधक जर्मनीत वास्तव्य आणि काम करु शकणार आहेत. हा व्हिसा ‘जर्मनी रीसर्चर व्हिसा’ म्हणून ओळखला जात आहे. या व्हिसावर जर्मनीत संशोधनाच्या कामासाठी दीर्घ काळापर्यंत वास्तव्य करण्याची सोय आहे. जर्मनी हे शास्त्रीय आणि तंत्रवैज्ञानिक शोधांचे दुसऱ्या क्रमांकाचे राष्ट्र म्हणून ओळखले जाते. भारतीयांना येथे चांगली संधी उपलब्ध असून ते तेथील मान्यवर संस्थांमध्ये प्रवेश घेऊ शकतात.

हा व्हिसा कोणासाठी…

आपण कोणत्या देशाचे नागरीक आहात, याच्यावर या व्हिसाची आपल्याला आवश्यकता आहे, की नाही हे ठरत असते. तसेच ते कितीकाळासाठी जर्मनीत वास्तव्य करण्याची योजना बनवित आहेत, यावरही ही हे अवलंबून आहे. ज्या देशांशी जर्मनीचा व्हिसामुक्त प्रवेश करार झाला आहे, त्यांच्यासाठी अशा विशेष व्हिसाची आवश्यकता नाही. तथापि, असा करार ज्या देशांशी नाही, त्या देशांमधील नागरीकांना जर्मनीत कामासाठी हा व्हिसा उपयुक्त ठरणार आहे.

या व्हिसासाठी अटी कोणत्या…

या व्हिसासाठी इच्छुकाचे जर्मनीतल्या कोणत्याही अधिकृत संशोधन संस्थेशी होस्टिंग अॅग्रीमेंट झालेले असावयास हवे. तसेच कोणत्याही संशोधकाचे अशा संस्थांशी वर्क काँट्रॅक्ट झालेले असेल, त्यालाही हा व्हिसा मिळू शकतो. या संशोधकाने त्याच्या संशोधनाच्या विषयात डॉक्टरेट किंवा तत्सम शैक्षणिक पात्रता मिळविलेली असली पाहिजे. तसेच ज्या संशोधकांकडे जर्मनीत वास्तव्य करण्याची आर्थिक क्षमता आहे, अशा संशोधकांना हा व्हिसा मिळू शकतो. जर्मनीतील संशोधन संस्थांवरही काही उत्तरदायित्व टाकण्यात आलेले आहे. संशोधनकार्य पूर्ण झाल्यानंतरही या संशोधकाने सहा महिन्यापर्यंत जर्मनी राहण्यासाठीचा खर्च या संस्थेला करावा लागणार आहे. या अटी पूर्ण झाल्यास तो हा व्हिसा मिळवू शकतो.

हा व्हिसा फायदेशीर आहे का?

हा व्हिसा भारतातील अनेक बुद्धीमान आणि कष्टाळू संशोधकांसाठी लाभदायक आहे. कारण जर्मनी हे प्रगत राष्ट्र आहे. तेथे संशोधनासाठी अशी सामग्री उपलब्ध आहे, की, जी सहसा त्याला त्याच्या देशात मिळू शकत नाही. त्यामुळे त्याची बुद्धीमत्ता आणि क्षमता यांना जर्मनीत न्याय मिळू शकतो. तेथे संशोधन कार्यासाठी त्यांना पुरेसे मानधनही, ते ज्या संस्थेसाठी काम करतात, त्या संस्था त्यांना देतात. परिणामी, काम करण्याची संधी आणि मानधन अशी दुहेरी सोय यामुळे होते.

भारतीयांसाठी जर्मनी प्रयत्नशील

भारताच्या तंत्रवैज्ञानिक प्रतिभेला अधिकाधिक प्रमाणात आपल्याकडे आकृष्ट करण्यासाठी जर्मनी अधिकाधिक प्रयत्न करीत आहे. भारतात असे उच्चशिक्षित विद्वान मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांचा उपयोग उच्च तंत्रज्ञानाच्या विकासासाठी करण्यासाठी जर्मनी भारतीय संशोधकांसाठी विशेष प्रयत्नशील असल्याचे दिसते.

जर्मनीचा विशेष व्हिसा घेण्यासाठी…

ड संशोधकाकडे संबंधित विषयातील डॉक्टरेट किंवा पीएचडी असणे आवश्यक

ड जर्मनीत राहण्याची व्यवस्था, तसेच खर्च पेलण्याची क्षमता असलेल्यांना संधी

ड संशोधन संस्थेकडून अशा व्यक्तींना कामासाठी पुरेसे मानधन दिले जाणार

ड संशोधन कार्य आटोपल्यानंतरही जर्मनीत सहा महिने वास्तव्याची व्यवस्था

Comments are closed.