मुद्रा – अवकाश क्षेत्राला नवे क्षितिज देणारी जोडी
<< अंजली महाजन
स्कायरूट एरोस्पेसने विकसित केलेल्या ‘पाम-1’ या रॉकेटने यशस्वीपणे पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करून भारताच्या खासगी अवकाश उद्योगासाठी नवे पर्व सुरू केले. या ऐतिहासिक मोहिमेच्या केंद्रस्थानी असलेल्या पवन कुमार चंदना आणि नागा भरत डाका या अभियंतांचा हा परिचय.
भारतीय अंतराळ संशोधनाच्या इतिहासात 18 जुलै 2026 हा दिवस सुवर्णाक्षरांनी नोंदवला गेला. हैदराबाद स्थित स्कायरूट एरोस्पेसने विकसित केलेल्या ‘पाम-1’ या रॉकेटने यशस्वीपणे पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करून भारताच्या खासगी अवकाश उद्योगासाठी नवे पर्व सुरू केले. भारतात खासगी कंपनीने पूर्णपणे विकसित केलेले आणि कक्षेत पोहोचलेले हे पहिले रॉकेट ठरले. या यशामुळे अमेरिका आणि चीननंतर खासगी कंपन्यांमार्फत कक्षीय रॉकेट प्रक्षेपण करणाऱ्या देशांच्या यादीत भारताचाही समावेश झाला. या ऐतिहासिक मोहिमेच्या केंद्रस्थानी पवन कुमार चंदना आणि नागा भरत डाका हे दोन भारतीय अभियंते होते.
पवन चंदना यांनी आयआयटी खरगपूरमधून यांत्रिकी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर 2012 ते 2018 या काळात इस्रोमध्ये प्रक्षेपण वाहन कार्यक्रमात वैज्ञानिक म्हणून काम केले. नागा भरत डाका यांनी आयआयटी मद्रासमधून विद्युत अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. त्यांनी इस्रोमध्ये एव्हियोनिक्स अभियंता म्हणून काम केल्यानंतर झायलिंक्स या जागतिक सेमीकंडक्टर कंपनीत अनुभव मिळवला.
2018 मध्ये या दोघांनी सुरक्षित नोकरीचा त्याग करून स्कायरूट एरोस्पेसची स्थापना केली. त्या वेळी भारतात खासगी अवकाश उद्योगासाठी ना स्पष्ट धोरण होते, ना गुंतवणूकदारांचा विश्वास. मात्र भविष्यातील अवकाश अर्थव्यवस्थेत भारत महत्त्वाची भूमिका बजावेल, असा त्यांचा ठाम विश्वास होता. जागतिक दर्जाची प्रक्षेपण वाहने भारतात तयार करून उपग्रह प्रक्षेपण अधिक सुलभ आणि परवडणारे करणे, हेच त्यांचे ध्येय होते.
त्यांच्या निर्णयानंतर अवघ्या दोन वर्षांत भारत सरकारने 2020 मध्ये ऐतिहासिक सुधारणा करत खासगी क्षेत्रासाठी अवकाश उद्योग खुला केला. खासगी कंपन्यांना रॉकेट आणि उपग्रह विकसित करण्यास तसेच इस्रोच्या प्रक्षेपण सुविधांचा वापर करण्यास परवानगी मिळाली. या धोरणामुळे भारतात चारशेहून अधिक स्पेस-टेक स्टार्टअप्स उभे राहिले आणि नव्या उद्योग परिसंस्थेचा जन्म झाला. स्कायरूट एरोस्पेस आज एक अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक मूल्यांकन असलेली भारतातील पहिली स्पेस-टेक ‘युनिकॉर्न’ कंपनी बनली आहे.
‘पाम-1’च्या पहिल्याच उड्डाणात कक्षेत पोहोचणे हे अत्यंत दुर्मीळ यश मानले जाते. स्वतः पवन चंदना यांनी नमूद केले आहे की, जगातील अग्रगण्य स्पेसएक्सलाही पहिल्याच प्रयत्नात यश मिळाले नव्ह़ते. त्यांना चौथ्या प्रयत्नात कक्षा गाठता आली. त्यामुळे स्कायरूटचे यश तांत्रिकदृष्ट्या अधिक महत्त्वाचे मानले जात आहे.
स्कायरूटची सर्वात वेगळी संकल्पना म्हणजे ‘अंतराळातील कॅब सेवा’. सामान्यतः मोठ्या रॉकेटमधून अनेक ग्राहकांचे उपग्रह एकाच वेळी सोडले जातात. त्यामुळे उपग्रह मालकांना आपल्या उपग्रहासाठी योग्य कक्षेची आणि योग्य वेळेची अनेक महिने किंवा वर्षे प्रतीक्षा करावी लागते. स्कायरूट ही अडचण दूर करू इच्छिते. पवन चंदना यांचे उदाहरण यासाठी बोलके आहे. मित्राच्या घरी जायचे असेल तर रेल्वेची गरज नसते. आपण थेट कॅब बुक करतो. त्याच धर्तीवर ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार स्वतंत्र प्रक्षेपण सेवा उपलब्ध करून देण्याची स्कायरूटची योजना आहे.
लघू उपग्रहांची संख्या जगभर वेगाने वाढत आहे. हवामान अंदाज, कृषी, मत्स्य व्यवसाय, इंटरनेट, दूरसंचार, आपत्ती व्यवस्थापन, जीपीएस आणि संरक्षण क्षेत्रासाठी या उपग्रहांचे महत्त्व सातत्याने वाढत आहे. त्यामुळे जलद, अचूक आणि सानुकूल प्रक्षेपण सेवांची मागणीही मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. या वाढत्या जागतिक बाजारपेठेत भारताला स्पर्धात्मक स्थान मिळवून देण्याचा स्कायरूटचा प्रयत्न आहे.
इस्रोमध्ये मिळालेला अनुभव, धाडसी उद्योजकीय निर्णय आणि सरकारने निर्माण केलेले अनुकूल धोरणात्मक वातावरण यांचा संगम घडल्यास भारतीय खासगी उद्योग जागतिक स्तरावर किती मोठी झेप घेऊ शकतो, याचे प्रेरणादायी उदाहरण म्हणून या नवोन्मेषी जोडीने आदर्श उभा केला आहे. भारतीय अवकाश संशोधनाच्या नव्या युगात त्यांचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल यात शंकाच नाही!
Comments are closed.