स्कायरूटच्या ‘विक्रम-1’कडून सूर्योदयाचा पहिला व्हिडिओ प्राप्त अवकाशातील कक्षेतून टिपलेले अद्भुत दृश्य समोर
► न्यूज एजन्सी हैदराबाद
इतिहास रचल्यानंतर एका आठवड्याने भारताची खासगी अवकाश स्टार्टअप कंपनी, स्कायरूट एरोस्पेसने एक चित्तथरारक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांच्या विक्रम-1 रॉकेटमधून कक्षेतून दिसलेल्या पहिल्या सूर्योदयाचे चित्रण आहे.
18 जुलै रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित झालेल्या विक्रम-1 च्या ऑनबोर्ड कॅमेऱ्याने घेतलेल्या या फुटेजमध्ये रॉकेटच्या ऑर्बिटल अॅडजस्टमेंट मॉड्यूलच्या मागून सूर्यप्रकाश डोकावताना दिसत आहे.
स्कायरूटचे सह-संस्थापक पवन कुमार चंदना यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया वाहिनीवर सूर्योदयाच्या व्हिडिओसंबंधीची माहिती दिली आहे. प्रक्षेपणाला झालेल्या 35 मिनिटे 30 सेकंदांच्या विलंबामुळे हे सुंदर दृश्य शक्य झाले. या विलंबामुळे उड्डाणाची वेळ दुपारी 12:05:30 पर्यंत पुढे ढकलली गेल्यामुळे सूर्याच्या तुलनेत रॉकेटची स्थिती बदलल्याचे त्यांनी म्हटले आहे.
“सूर्याचा तो अचूक कोन प्रक्षेपणाला झालेल्या विलंबाचा परिणाम होता. कधीकधी, ब्रह्मांड आपली जादू दाखवते. अंतराळातून घेतलेल्या आतापर्यंतच्या सर्वात सुंदर फुटेजपैकी हे एक आहे.” असे मतप्रदर्शनही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये पेले आहे.
‘स्कायरुट एअरोस्पेस’ या खासगी कंपनीने निर्माण केलेल्या ‘विक्रम-1’ या कक्षीय अग्निबाण वाहनाचे 18 जुलै रोजी यशस्वीपणे प्रक्षेपण करण्यात आले होते. या प्रक्षेपणासह भारताच्या खासगी क्षेत्राने अंतराळ संशोधनात पदार्पण केले होते. हे प्रक्षेपण भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रातून झाले होते. हे अभियान यशस्वी करण्यात कंपनीच्या तरुण अभियंत्यांचे महत्त्वाचे योगदान आहे.
काय आहे ‘विक्रम-1’
विक्रम-1 हे सात मजली मल्टिस्टेज ऑर्बिटल प्रक्षेपण वाहन आहे. त्याचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले आहे. या अभियानाचे कंपनीने ‘मिशन आगमन’ असे नामकरण केले आहे. तर, या अग्निबाण वाहनाचे नामकरण ‘विक्रम-1’ असे करण्यात आले आहे. याची निर्मिती पूर्णत: स्वदेशी असून त्याची संपूर्ण रचना कार्बनसंमिश्र साधनांनी करण्यात आली आहे.
याची प्रक्षेपण व्यवस्था (प्रॉपेल्शन सिस्टिम) देखील भारत निर्मित आहे. या अग्निबाणाची क्षमता 350 किलोग्रॅम वजनापर्यंतचे लहान आकारांचे उपग्रह पृथ्वीभोवतीच्या उपकक्षीय मार्गांमध्ये स्थापित करण्याची आहे, अशी माहिती या कंपनीकडून देण्यात आली आहे.
Comments are closed.