आसाममध्ये कारखान्यात झालेल्या स्फोटात ४ कामगारांचा मृत्यू

वृत्तसंस्था

दिसपूर

आसामच्या कचार जिह्यातील एका कारखान्यात रविवारी सकाळी झालेल्या मोठ्या स्फोटात किमान चार कामगार ठार झाले. तसेच अनेक जण जखमीही झाले. उधरबंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पांगराम येथे असलेल्या ‘काडे ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर एलएलपी’ नावाच्या रॉड निर्मिती कारखान्यात सकाळी 11:30 च्या सुमारास स्फोट झाला. हा स्फोट इतका शक्तिशाली होता की कारखान्याच्या काही भागांचे पूर्णपणे नुकसान झाले. हा स्फोट गॅस सिलिंडरच्या भडक्यामुळे झाला असावा, असा अंदाज आहे. तथापि, अपघाताचे नेमके कारण अद्याप तपासले जात आहे. घटनेची माहिती मिळताच, पोलीस, स्थानिक प्रशासन आणि बचाव पथके तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. जखमी कामगारांना तात्काळ जवळच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले. स्फोटाच्या वेळी अनेक कामगार कारखान्यात उपस्थित असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती अधिकाऱ्यांना वाटत आहे. बचाव आणि मदतकार्य सध्या सुरू आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे.

Comments are closed.