माथेरानच्या घाटात दरड कोसळली, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली
निसर्गरम्य माथेरानच्या घाटात ऐन पावसाळ्यात भलीमोठी दरड शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास कोसळली. पिटकर पॉईंटच्या जवळ असलेल्या धबधब्यानजीक ही घटना घडली. केवळ दैव बलवत्तर म्हणून मोठी दुर्घटना टळली आहे. २४ तास उलटून गेले तरी सार्वजनिक बांधकाम विभागाची कोणतीही यंत्रणा अद्याप पोहोचलेली नाही. आज रविवारी पर्यटकांची तुफान गर्दी होती. या दरडीमुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरूनच घाटातून प्रवास करावा लागला.
माथेरानच्या घाटरस्त्यामध्ये दरवर्षी पावसाळ्यात लहान, मोठ्या दरडी कोसळत असतात. शनिवारी रात्री उशिरा वॉटर पाइप स्टेशनच्या खालील वळणावर प्रचंड मोठा दगड कोसळला. ही दरड दिवसा कोसळली असती तर गाड्यांचा चक्काचूर होऊन मोठी जीवित हानी झाली असती.
माथेरानमधील पावसाचा आनंद लुटण्यासाठी शनिवारी व रविवारी पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. दरड दिवसा कोसळली असती तर मोठा अनर्थ झाला असता.
घाटातील रस्त्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे. भलीमोठी दरड कोसळून एक दिवस उलटला तरी अजूनपर्यंत या खात्याची कोणतीही आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी पोहोचली नाही.
Comments are closed.