श्रीलंका दौऱ्याआधी टीम इंडियासाठी दिलासादायक वृत्त! स्टार अष्टपैलू फिट आणि निवडीसाठी उपलब्ध

भारतीय वरिष्ठ पुरुष क्रिकेट संघ ऑगस्ट महिन्यात श्रीलंकेचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार असून, ती आयसीसी कसोटी चॅम्पियनशीप 2025-27 चा भाग आहे. यामुळे भारताला या मालिकेत चांगली कामगिरी करणे अपेक्षित आहे. यासाठी भारताच्या संघनिवडीसाठी स्टार अष्टपैलू फिट आणि उपलब्ध असल्याची मोठी बातमी समोर येत आहे.

अनुभवी फिरकीपटू आणि स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा फिट घोषित झाला आहे. यामुळे तो श्रीलंका दौऱ्यासाठी उपलब्ध आहे. त्याला आयपीएल 2026 दरम्यान दुखापत झाली होती आणि मे महिन्यापासून तो मैदानाबाहेर होता. भारतासाठी तो शेवटी जानेवारी 2026 मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सामन्यात खेळला होता.

जडेजा उपलब्ध असल्याने भारताच्या संघनिवड समितीची डोकेदुखी काही प्रमाणात कमी झाली आहे, मात्र वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी आणि हर्षित राणा यांच्या फिटनेसचा प्रश्न कायम आहे.

सुंदरला इंग्लंड दौऱ्यावेळी पायाची दुखापत झाली होती. यामुळे तो इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्याला मुकला होता. आता तो श्रीलंका दौऱ्यातील पहिल्या कसोटी सामन्यासाठीही अनुपलब्ध आहे, तर दुसऱ्या कसोटीसाठीची उपलब्धता त्याच्या फिटनेसवर अवलंबून आहे.

श्रीलंकाविरुद्धचा पहिला कसोटी सामना 15 ते 19 ऑगस्टदरम्यान गॉल येथे आणि दुसरा कसोटी सामना 23 ते 27ऑगस्टदरम्यान कोलंबो येथे खेळला जाणार आहे.

Comments are closed.