टीईटी घोटाळ्यातील आरोपी हा भाजपशी संबंधित, तो एका नेत्याचे आर्थिक व्यवहार सांभाळतो; रोहित पवारा
रोहित पवार: नीट (NEET) पेपर लीक प्रकरणाचा वाद शांत होत नाही तोच महाराष्ट्रात एमपीएससी (MPSC) औषध निरीक्षक भरती परीक्षेतील कथित गैरप्रकार आणि टीईटी (TET) घोटाळ्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पत्रकार परिषद घेत याप्रकरणी गंभीर आरोप केले आहेत. “टीईटी घोटाळ्यातील आरोपी हा भाजपशी संबंधित असून, तो एका नेत्याचे आर्थिक व्यवहार सांभाळतो,” असा सनसनाटी दावा रोहित पवार यांनी केला आहे.
रोहित पवार म्हणाले की, “एमपीएससी पेपर लीक प्रकरण समोर आलं आहे. महाराष्ट्रात पेपरफुटीची प्रकरणे 2026 मध्ये समोर आली. त्यात टीईटी, नीट आणि एसआरपीएफचा पेपर फुटला होता. एफडीएमध्ये औषध निरीक्षक पेपर लीक झाला आहे. जर अशा प्रकारे पेपरफुटीमधून अधिकारी होणार असतील, तर काही दिवसांपूर्वी खोकल्याच्या औषधाने 22 मुलांचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते, अशा घटना अशा अधिकाऱ्यांमुळे घडणार. महाराष्ट्रात हे प्रकरण कसं घडलं, तर नंदूरबारमध्ये कौटिल्य ॲकेडमी नावाचा एक क्लास आहे. त्या क्लासमधून एका माणसाने पेपर लीक केला. एमपीएएससीचा पूर्ण पेपर फुटला असे म्हणता येणार नाही, पण पेपर सेट करणारा व्यक्ती फुटला. ज्याने पेपर फोडला, त्या व्यक्तीने ज्यांना पेपर दिले, त्यांना तो व्हॉट्सॲपच्या माध्यमातून पाठवत होता आणि 5 मिनिटांनी डिलीट करत होता. त्याने ज्याला पाठवले, त्यातील एकाने त्याच्या मित्राला प्रश्नपत्रिका पाठवल्या होत्या, त्यातून हे प्रकरण समोर आलं आहे.
Rohit Pawar: पोलिसांकडून कारवाईची धमकी
एक नायब तहसीलदार आहेत, त्यांच्या एका मुलाला 13 वा रँक आणि मुलीला 16 वा रँक आला आहे. आता हा योगायोग आहे का? हा प्रश्न आहे. यामध्ये बार्शी कनेक्शन आम्हाला कळलं आहे. विद्यार्थ्यांनी 21 जुलैला एमपीएससीला तक्रार केली आहे. परंतु, त्यांच्याकडून कोणतीही हालचाल करण्यात आलेली नाही. उलट पोलिसांकडून कारवाईची धमकी दिली जात आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला.
Rohit Pawar: तलाठी भरतीत 62 घोटाळेबाज सापडले
रोहित पवार पुढे म्हणाले की, एमपीएससी आयोग आणि एफडीए यांनी तत्काळ या प्रकरणाची चौकशी करावी. सीबीआयकडे हे प्रकरण देण्यात यावे. सीआयडीचा आम्हाला चुकीचा अनुभव आहे. तलाठी भरतीबाबत आम्ही पुरावे मुख्यमंत्र्यांकडे दिले होते. मात्र पुढे काही झाले नाही. शेवटी मुले मॅटमध्ये गेली. मॅटने जो निकाल दिला, त्यात त्यांनी लिहिलं आहे की, 62 घोटाळेबाज तलाठी भरतीत सापडले आहेत.
Rohit Pawar: टीईटी घोटाळ्यातील आरोपी हा भाजपशी संबंधित
2018 मध्ये पहिल्यांदा टीईटी पेपर फुटला होता. आता जो पेपर फुटला, त्यात पुन्हा एकदा प्रीतीश देशमुख, अभिषेक सावरीकर आणि सुशील खोडवेकर यांचा या प्रकरणाशी संबंध आहे. अभिषेक सावरीकर कोणाशी संबंधित आहे? त्याचे लाड कोण करत आहेत? त्याचे क्रिस्टल क्लिअर संबंध कोणाशी आहेत? टीईटी घोटाळ्यातील आरोपी हा भाजपशी संबंधित आहे. अभिषेक सावरीकर नावाचा हा व्यक्ती एका नेत्याचे आर्थिक विषय देखील सांभाळत आहे,” असा दावा रोहित पवार यांनी केला. तर, आम्ही एमपीएससी कार्यालयात आम्ही जाणार आहोत आणि तुकाराम मुंढे यांना देखील भेटणार आहोत, असे देखील रोहित पवार यांनी सांगितले.
आणखी वाचा
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Comments are closed.