ठाण्यात भरदिवसा सराफावर हल्ला; 65 लाखांचे सोने लुटले
वर्तकनगर परिसरात भरदिवसा सराफाला चाकूचा धाक दाखवून ६५ लाखांचा ऐवज लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शांतीलाल कोठारी असे सराफाचे नाव आहे. भरदिवसा हा प्रकार घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्रिकुटाचा शोध घेत आहेत.
मुंबईतील डोंगर येथे राहणारे शांतीलाल कोठारी हे १८ कॅरेट सोन्याचे दागिने तयार करून ठाणे परिसरात विक्री करण्याचा व्यवसाय करतात. सुमारे ६०१.२५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि १५ हजार रुपयांची रोकड पर्समध्ये ठेवून विक्रीसाठी ते ठाण्याकडे निघाले. मुलुंड रेल्वे स्थानकावर उतरून दुचाकीने ठाण्याकडे जात होते. मात्र साठेनगर नाका, रोड क्रमांक २२ येथे ते लघुशंकेसाठी थांबले. त्यावेळी मागून आलेल्या एका आरोपीने त्यांचा गळा आवळला. दुसऱ्या आरोपीने चाकूचा धाक दाखवत गळ्यातील पर्सचा पट्टा कापला. या झटापटीत कोठारी यांच्या डाव्या हाताला दुखापत झाली. आरडाओरडा करताच दोन्ही आरोपी तिसऱ्या साथीदाराच्या दुचाकीवर बसून पसार झाले.
Comments are closed.