थलपती विजयनंतर आता धनुषही राजकारणाच्या मैदानात? एका विधानाने तमिळनाडूत चर्चांना उधाण

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

साऊथ चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता धनुष याच्या राजकारणातील संभाव्य प्रवेशाची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे. अभिनेता थलपती विजयने राजकीय पक्ष स्थापन केल्यानंतर आता धनुषही राजकारणात उतरणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

रविवारी त्याच्या फॅन्स क्लबतर्फे आयोजित रक्तदान शिबिरात केलेल्या एका विधानामुळे या चर्चांना अधिकच उधाण आले. कार्यक्रमात बोलताना धनुषने आपल्या चाहत्यांच्या एकजुटीचे कौतुक केले आहे. ही ताकद केवळ चित्रपटांच्या प्रचारासाठी किंवा फॅन मीटपुरती मर्यादित न ठेवता समाजसेवेसाठी वापरण्याची गरज असल्याचे त्याने सांगितले. तसेच प्रत्येक चाहत्याने आपल्या परिसरातील गरजू कुटुंबांची ओळख करून त्यांना शक्य ती मदत करावी, असे आवाहनही त्याने केले. असे वृत्त लोकमतने दिले आहे.

धनुषच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर त्याच्या राजकीय प्रवेशाबाबत चर्चांना सुरुवात झाली. ‘एक्स’ वर अनेकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या. काहींनी तो थलपती विजयच्या पावलावर पाऊल ठेवत राजकारणात उतरणार असल्याचा अंदाज व्यक्त केला, तर काहींनी तमिळनाडूला सुशिक्षित आणि शिस्तबद्ध नेतृत्वाची गरज असल्याचे म्हणत धनुषच्या संभाव्य राजकीय प्रवासाचे स्वागत केले. काही चाहत्यांनी तर तो लवकरच स्वतःच्या राजकीय पक्षाची घोषणा करू शकतो, असा दावाही केला. मात्र, धनुषने अद्याप राजकारणात प्रवेशाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

दरम्यान, याच कार्यक्रमात धनुषने राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवरून सुरू असलेल्या वादावरही भाष्य केले. 2024 मधील ‘रायन’ या त्याने दिग्दर्शित केलेल्या चित्रपटापेक्षा काही अन्य तमिळ चित्रपट अधिक चांगले होते, हे त्याने स्पष्टपणे मान्य केले. मात्र, वाद घालण्यापेक्षा एका वर्षात तमिळ चित्रपटसृष्टीला मिळालेल्या दोन राष्ट्रीय पुरस्कारांचा आनंद साजरा करावा, असे आवाहन त्याने केले.

यंदाच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये धनुषला ‘कॅप्टन मिलर’ चित्रपटातील अभिनयासाठी स्पेशल मेंशन पुरस्कार मिळाला, तर ‘रायन’ ला सर्वोत्कृष्ट तमिळ चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. या पुरस्कारांवर काही प्रमाणात टीका झाली असली, तरी धनुषने सकारात्मक भूमिका घेत तमिळ चित्रपटसृष्टीच्या यशाचा आनंद साजरा करण्याचे आवाहन केले आहे.

Comments are closed.