पुष्पास्टाईल चोरी… भाजीपाल्याच्या गाडीतून खैराची तस्करी, वन विभागाकडून लाकडासह टेम्पो जप्त
पालघर: वसई-विरार परिसरात खैर तस्करांनी (Thief) पुन्हा एकदा डोके वर काढले असून, भाजीपाल्याची वाहतूक करत असल्याचे भासवून खैराच्या लाकडांची तस्करी करण्याचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वसईच्या (Vasai) भाताणे वनक्षेत्रातील वन कर्मचाऱ्यांनी सोमवारी पहाटे मेढे परिसरात ही कारवाई केली. सुमारे 7 ते 8 किलोमीटर पाठलाग करून अवैध खैर वृक्षांची वाहतूक करणारा टेम्पो जप्त करण्यात आला असून, अंधाराचा फायदा घेत चालक पसार झाला आहे.या चोरीच्या घटनेमुळे पुन्हा एकदा पुष्पा सिनेमाची आठवण झाली असून पुष्पास्टाईल (Pushpa) चोरीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.
वसई पूर्वेच्या मेढे परिसरातून खैर लाकडाची बेकायदेशीर वाहतूक होणार असल्याची पक्की बातमी वन विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे वन अधिकाऱ्यांनी परिसरात तातडीने विशेष नाकाबंदी तैनात केली. पहाटेच्या सुमारास एक संशयित ‘टाटा इन्ट्रा’ टेम्पो (क्रमांक MH 47 AS 2460) येताना दिसला. वन कर्मचाऱ्यांनी इशारा करूनही चालकाने टेम्पो न थांबवता त्याचा वेग वाढवून पळ काढण्याचा प्रयत्न केला. वन कर्मचाऱ्यांच्या पथकाने भरधाव वेगात पाठलाग करून टेम्पोला रोखले; मात्र चालक अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला.जप्त केलेल्या टेम्पोची झडती घेतली असता वर भाजीपाला आणि खाली बेकायदेशीररीत्या खैर लाकडाची वाहतूक सुरू असल्याचे निष्पन्न झाले. या कारवाईत 1.284 घनमीटर (एकूण 77 ओंडके) खैर जातीचे लाकूड, ज्याची अंदाजे किंमत 14,892 रुपये आहे, तसेच टेम्पो असा मुद्देमाल वन विभागाने ताब्यात घेतला आहे.
दरम्यान, ही कारवाई डहाणूचे उपवनसंरक्षक निरंजन दिवाकर आणि मांडवीचे उपविभागीय वनअधिकारी अमित भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यात भाताणेचे वनपरिक्षेत्र अधिकारी मनिष महाले, वनपाल आर. एस. माळगावी, व्ही. जी. राख, एन. बी. खुळपे तसेच वनरक्षक एस. एस. पवार, एल. एल. हमरे, डी. एन. सावरा व वनमजूर चंदन खानिवडेकर यांच्या पथकाने मोलाची भूमिका बजावली. पसार झालेल्या चालकाचा कसून शोध सुरू असून वन विभाग या प्रकरणी अधिक तपास करत आहे.
हेही वाचा
24 वर्षांनी मायेच्या सावलीत, लेक परतला आईच्या कुशीत; SIR यादी पडताळणीतून उलगडा, अश्रूंचा बांध फुटला
Comments are closed.