नेमबाजी विश्वचषक स्पर्धा – ईशाचा सुवर्णवेध; मनूला कांस्यपदक
हिंदुस्थानची उदयोन्मुख नेमबाज ईशा सिंहने आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेतील महिला 25 मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक पटकावले. अंतिम फेरीत तिने ऑलिम्पिक पदकविजेती सहकारी मनू भाकरला मागे टाकत सुवर्णावर नाव कोरले, तर मनूला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. या प्रकारात हिंदुस्थानने एकाच वेळी दोन पदके जिंकत आपले वर्चस्व सिद्ध केले.
21 वर्षीय ईशाने अंतिम फेरीत अचूक नेमबाजी करत 40 गुणांची कमाई केली आणि सुवर्णपदक आपल्या नावे केले. 2024च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन कांस्यपदके जिंकणाऱ्या मनू भाकरने शूट-ऑफमध्ये बाजी मारत 28 गुणांसह कांस्यपदक जिंकले.
पात्रता फेरीतही दमदार सुरुवात
हिंदुस्थानी नेमबाजांनी पात्रता फेरीपासूनच प्रभावी खेळ दाखवला. मनू भाकरने 586 गुणांसह अव्वल स्थान पटकावले, तर ईशा सिंहने 585 गुणांसह दुसरे स्थान मिळवत अंतिम आठमध्ये सहज प्रवेश केला. माजी आशियाई क्रीडा स्पर्धा सुवर्णपदकविजेती राही सरनोबत हिने 582 गुणांची नोंद केली, तर सिमरनप्रीत कौर बराड (576) आणि अभिदन्या अशोक पाटील (573) यांनी केवळ रँकिंग गुणांसाठी (आरपीओ) खेळताना उल्लेखनीय कामगिरी केली.
या पदकामुळे आत्मविश्वास वाढला
या हंगामाच्या सुरुवातीला म्युनिक विश्वचषकात सुवर्णपदक जिंकणाऱया ईशाने सांगितले, ‘‘मागील विजयामुळे माझ्यावर मोठा दबाव होता. चांगली कामगिरी केल्यानंतर अपेक्षा वाढतात. मात्र आज त्या दबावावर मात करण्यात मी यशस्वी झाले, याचा मला आनंद आहे.’’ मनू भाकरनेही या पदकाचे महत्त्व अधोरेखित केले. ती म्हणाली, ‘‘हे पदक माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. यासारख्या यशामुळे पुढील वाटचालीसाठी आत्मविश्वास मिळतो. आता मी योग्य दिशेने जात असल्याची खात्री मिळाली आहे. या यशाचा आगामी विश्व अजिंक्यपद स्पर्धा आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत निश्चितच फायदा होईल.’’
Comments are closed.