आजच्या पिढीचा केमिकल लोचा झालाय, त्यांना काही सांगणही अवघड झालंय; ‘जेन झी’बाबत विश्वास नांगरेंच
Gen-Z वर विश्वास नांगरे पाटील: गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील जंतर मंतर येथील विद्यार्थी आंदोलनाने देशभरातील राजकीय, सामाजिक आणि इंटरनेटचा अवकाश व्यापून टाकला आहे. सुरुवातीला अत्यंत फुटकळ वाटणाऱ्या या आंदोलनाने (Jantar Mantar Protest) अवघ्या काही दिवसांत प्रचंड स्वरुप धारण केल्याने केंद्र सरकारला नमते घ्यावे लागले होते. यामुळे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांना आपल्या पदाचा राजीनामा देण्याची नामुष्की ओढावली होती. गेल्या 12 वर्षांमध्ये विरोधकांनी जे जमले नाही ती कामगिरी जेन झी पिढीच्या (Gen-Z Generation) युवकांनी करुन दाखवल्याने त्यांच्यावर सध्या कौतुकाचा वर्षावही होत आहे. मात्र, हा सगळा कौतुक सोहळा सुरु असताना पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangre Patil) यांनी जेन झी पिढीबाबत काहीसे वेगळे मत व्यक्त केले आहे. जेन झी पिढी सतत मोबाईलवर असते. त्यामुळे त्यांच्या विचार क्षमतेवर परिणाम होऊन त्यांच्या डोक्यात केमिकल लोचा झाल्याचे मत विश्वास नांगरे पाटील यांनी व्यक्त केले आहे. ते सोमवारी कारगिल विजय दिनानिमित्त (Kargil Vijay Divas) भोसला मिलिटरी स्कूलतर्फे आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात बोलत होते.
या कार्यक्रमात विश्वास नांगरे पाटील यांनी नव्या पिढीबाबत काही मतं मांडली. त्यांनी म्हटले की, आजच्या पिढीचा स्क्रीन टाइम मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सतत मोबाईलवर स्क्रोल करण्याच्या सवयीमुळे विचार करण्याची आणि भावनिकदृष्ट्या परिस्थिती हाताळण्याची क्षमता प्रभावित होत आहे. एकंदरित केमिकल लोचा झाला आहे. तसेच, बौद्धिक, भावनिक आणि सामाजिक विकासाबरोबरच कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याची ताकदही प्रत्येकामध्ये विकसित होणे गरजेचे असायला हवी, असे विश्वास नांगरे पाटील यांनी म्हटले.
‘जेन-झी’ ही देशाचे भविष्य आहे. मात्र, आजच्या काळात त्यांना काही सांगणंसुद्धा अवघड झालं आहे. पोलीस असोत किंवा सीमेवरील जवान, त्यांची सेवा ही कधीही न थांबणारी असते. कितीही काम केलं तरी टीका आणि शिव्या पोलिसांच्या वाट्याला येतात. गेल्या काही दिवसांपासून तर मीच अधिक शिव्या खातोय, अशी खंतही विश्वास नांगरे पाटील यांनी बोलून दाखवली.
आणखी वाचा
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Comments are closed.