भारत हे वैद्यकीय पर्यटनाचे केंद्र बनत आहे.
16 वर्षांमध्ये विदेशी रुग्णांच्या संख्येत चौपट वाढ
► वृत्तसंस्था
नवी दिल्ली
भारत आता वेगाने वैद्यकीय पर्यटकाचे जागतिक केंद्र म्हणून उदयास येत आहे. गेल्या 16 वर्षांमध्ये भारतात वैद्यकीय उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत तब्बल चौपट वाढ झाली आहे. 2009 मध्ये भारतात वैद्यकीय उपचार घेण्यासाठी 1 लाख 12 हजार विदेशी रुग्ण आले. आता 2025 मध्ये ही संख्या 5.07 लाख इतकी झाली आहे. ही वाढ साडेचार पट मोठी असल्याची माहिती दिली गेली.
भारतात वैद्यकीय उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांमध्ये बांगला देश, उझबेकिस्तान, सोमालिया, ओमान आणि केनिया या देशांचा प्रामुख्याने समावेश आहे. याशिवाय भारतात प्रगत देशांमधूनही रुग्ण येत असतात. 2025 च्या आर्थिक वर्षात विदेशी रुग्णांवर भारतात उपचार करण्याच्या प्रक्रेयेतून 84 हजार कोटी रुपयांहून अधिक उलाढाल झाली आहे. पुढच्या चार वर्षांमध्ये ती 1 लाख 65 हजार कोटी होईल.
कमी दरात उत्तम उपचार
भारतात वैद्यकीय उपचारांचा खर्च कमी आहे. मात्र वैद्यकीय सेवेची गुणवत्ता उत्तम आहे. ज्या उपचारांसाठी अमेरिकेत 15 हजार रुपये खर्च येतो, तेच उपचार भारतात दीड ते तीन हजार रुपयांमध्ये होतात. नेदरलँडस् सारख्या देशात दातांवरच्या साध्या उपचारांसाठीही 16 हजार रुपयांचा खर्च येतो. तोच खर्च भारतातील कोणत्याही शहरांमध्ये 3 हजार रुपयांपेक्षा कमी आहे. भारतात येण्यासाठीचा प्रवास खर्च आणि भारतात उपचारांसाठी वास्तव्य करण्याचा खर्च जमेस धरुनही भारतात उपचार कमी दरात होतात, असा रुग्णांचा अनुभव आहे.
सेवेची मोठी उपलब्धता
भारतात 69 हजार रुग्णालये आहेत. तसेच भारतात प्रत्येक रोगावरचे तज्ञ डॉक्टर्सही मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे वैद्यकीय सेवा लवकर आणि उत्तम उपलब्ध होते. तज्ञ शस्त्रक्रिया विशारद आणि डॉक्टर्स मिळण्यासही कोणताही विलंब लागत नाही. भारतात खासगी आणि सरकारी अशी दोन्ही प्रकारांची रुग्णालये उपलब्ध आहेत. त्यामुळे जे रुग्ण पूर्वी उपचारांसाठी तुर्किये किंवा थायलंडला जात होते, त्यांनाही आपल्याकडे आकर्षित करण्याची योजना आहे.
गेल्या 12 वर्षांमध्ये विशेष प्रयत्न
विदेशी रुग्णांनी भारता यावे यासाठीच्या प्रयत्नांना गेल्या 12 वर्षांमध्ये मोठे प्राधान्य देण्यात आले आहे. केंद्र सरकारने यासाठी वैद्यकीय विभागाच्या अंतर्गत विशेष योजना लागू केली असून विदेशी रुग्णांचे उपचारांच्या काळातले भारतातील वास्तव्य सुलभ व्हावे, यासाठी प्रयत्न केले आहेत. विदेशी रुग्ण भारतात आल्याने केवळ वैद्यकीय व्यवसायालाच नव्हे, तर इतर व्यवसायांनाही लाभ होणार आहे.
व्हिसा प्रक्रिया सुलभ
भारताने आता जगातील 172 देशांसाठी मेडिकल व्हिसा प्रक्रिया सुलभ केली आहे. त्यामुळे या देशांच्या नागरीकांना ई-व्हिसा वैद्यकीय उपचारांसाठी मिळणे शक्य झाले आहे. त्यामुळे या देशांमधून भारतात उपचारांसाठी येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. भविष्यकाळात ती आणखी वाढणार असून त्यामुळे भारत दर्जेदार पण किफायतशीर वैद्यकीय उपचारांचे जागतिक केंद्र बनण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 2030 पर्यंत वैद्यकीय उपचारांसाठी भारतात येणाऱ्यांची संख्या सध्याच्या संख्येच्या दुप्पट होण्याचा दाट संमव असून भारताने त्यादृष्टीने सज्जता केली आहे.
Comments are closed.