Doorway Effect: एका खोलीत गेल्यावर आपण काय करायला आलो होतो ते का विसरतो?




डोअरवे इफेक्ट म्हणजे काय?


आपण कधी स्वयंपाकघरात पाणी आणायला जातो आणि तिथे पोहोचल्यावरच, “अरे, मी इथे कशासाठी आलो होतो?” असा प्रश्न स्वतःलाच विचारतो किंवा एका खोलीतून दुसऱ्या खोलीत गेल्यावर क्षणभरासाठी आपण काय काम करणार होतो, हे आठवतच नाही. ही समस्या फक्त तुमच्याच बाबतीत घडते असे नाही. यामागे आपल्या मेंदूची एक मनोरंजक प्रक्रिया काम करत असते, ज्याला मानसशास्त्रात ‘डोअरवे इफेक्ट’ (Doorway Effect) असे म्हटले जाते.

नेमका काय आहे ‘डोअरवे इफेक्ट’?
जेव्हा आपण एका जागेतून दुसऱ्या जागेत प्रवेश करतो, तेव्हा मेंदू त्या नवीन जागेला एका नव्या घटनेची सुरुवात मानतो. त्यामुळे मागील खोलीतील विचार किंवा काम तात्पुरते बाजूला पडते आणि नवीन वातावरणातील गोष्टींकडे मेंदूचे लक्ष वळते. परिणामी, आपण काही क्षणांसाठी मुळ काम विसरू शकतो.

संशोधन काय सांगतं?
मानसशास्त्रातील काही संशोधनांनुसार, जागा बदलताना मेंदू माहिती वेगवेगळ्या भागांमध्ये वर्गीकृत करतो. एका खोलीत सुरू असलेले काम आणि दुसऱ्या खोलीतील वातावरण हे मेंदू स्वतंत्र अनुभव म्हणून साठवतो. त्यामुळे खोली बदलल्यानंतर काही क्षणांसाठी आधीचा विचार आठवण्यास वेळ लागू शकतो.

हे टाळण्यासाठी काय कराल?
– खोली बदलण्यापूर्वी आपण काय करणार आहोत, हे मनात एकदा पुन्हा म्हणा.
– एका कामासाठी जाताना मध्येच मोबाईल पाहिल्यास लक्ष विचलित होण्याची शक्यता वाढते.
– मल्टिटास्किंगमुळे मेंदूवर अतिरिक्त ताण येतो आणि छोट्या गोष्टी विसरण्याची शक्यता वाढते.
– चांगली झोप मेंदूची स्मरणशक्ती आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमता सुधारण्यास मदत करते.

महत्वाची गोष्ट : अधूनमधून असा अनुभव येणे ही सामान्य बाब आहे. मात्र, वारंवार महत्त्वाच्या गोष्टी विसरणे, दैनंदिन कामांमध्ये अडथळे येणे किंवा स्मरणशक्तीबाबत गंभीर बदल जाणवत असतील, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरू शकते.



Comments are closed.