जपान हादरले! 7.1 तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का, त्सुनामीचा इशारा
दक्षिण जपानमध्ये 7.1 तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला असून या मोठ्या भूकंपानंतर आता त्सुनामीचा इशारा जारी करण्यात आला आहे. जपान सरकारने भूकंप आणि त्सुनामीसाठी आपत्कालीन इशारा जारी केला आहे. या भूकंपात मोठ्या प्रमाणात जिवीत आणि वित्तहानी झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दक्षिण जपानच्या कुमामोटोमध्ये ७.१ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला आहे. जपानच्या दक्षिणेकडील मुख्य बेट क्युशूवरील एका प्रांतात भूकंप झाला आहे. जपान हवामानशास्त्र संस्थेने (JMA) सांगितले की, भूकंपाचा केंद्रबिंदू समुद्राच्या पृष्ठभागाखाली १० किलोमीटर खोलीवर होता.
या भूकंपानंतर अधिकाऱ्यांनी त्सुनामीचा इशारा जारी केला असून एक मीटर (३.२८ फूट) उंचीच्या लाटा येण्याची शक्यता आहे. किनारपट्टी भागातील रहिवाशांना उंच ठिकाणी जाण्याचे आणि स्थलांतर सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जपान सरकारने जपानच्या दक्षिणेकडील क्युशू बेटावरील कुमामोटो, नागासाकी, कागोशिमा, फुकुओका, सागा, ओइता आणि मियाझाकी या प्रांतांसाठी भूकंपाचा आपत्कालीन इशारा जारी केला आहे. २५ जून रोजी उत्तर जपानमध्ये ७.२ तीव्रतेचा भूकंप झाला होता, परंतु त्यात कोणतीही जीवितहानी किंवा मोठे नुकसान झाले नाही. त्यानंतर हा दुसरा धक्का बसला आहे.
जपान हा जगातील सर्वाधिक भूकंपप्रवण देशांपैकी एक असून, तो पॅसिफिक ‘रिंग ऑफ फायर’च्या पश्चिम काठावर चार प्रमुख टेक्टॉनिक प्लेट्सवर वसलेला आहे. सुमारे १२.५ कोटी लोकसंख्या असलेल्या या द्वीपसमूहात दरवर्षी साधारणपणे शेकडो भूकंपाचे धक्के बसतात आणि जगातील एकूण भूकंपांपैकी सुमारे १८ टक्के भूकंप येथे होतात. बहुसंख्य भूकंप सौम्य स्वरूपाचे असतात, मात्र, काहीची तीव्रता खूप जास्त असते.
Comments are closed.