कधीही खेळला नाही आंतरराष्ट्रीय सामना, आता बनणार टीम इंडियाचा फील्डिंग कोच; कोण आहे शुभदीप घोष?
सुभदीप घोष टीम इंडियाचे नवे फील्डिंग कोच अपडेट : भारतीय क्रिकेट संघाला नवा क्षेत्ररक्षण प्रशिक्षक (Fielding Coach) मिळाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनुभवी प्रशिक्षक शुभदीप घोष यांची भारतीय संघाच्या नव्या क्षेत्ररक्षण प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी टी. दिलीप यांची जागा घेतली आहे. टी. दिलीप यांचा कार्यकाळ इंग्लंड दौऱ्यानंतर संपला असून, बीसीसीआयने (BCCI) तो पुढे न वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. शुभदीप घोष हे आगामी श्रीलंका दौऱ्यापासून भारतीय संघासोबत आपल्या या नव्या प्रवासाची सुरुवात करतील, जिथे 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. घोष हे 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत या पदाची जबाबदारी सांभाळतील.
कोण आहेत कोच शुभदीप घोष? (Who Is Subhadeep Ghosh)
शुभदीप घोष हे आसामचे रहिवासी आहेत. खेळाडू म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी त्यांना कधी मिळाली नसली, तरी प्रशिक्षक म्हणून त्यांचा अनुभव अत्यंत दांडगा आहे. त्यांनी भारतीय महिला क्रिकेट संघ आणि भारतीय अंडर-19 संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून काम पाहिले आहे. या वर्षाच्या सुरुवातीला जेव्हा भारतीय अंडर-19 संघाने विश्वचषक जिंकला, तेव्हा शुभदीप घोष हेच संघाचे फील्डिंग कोच होते. शुभदीप यांच्याकडे आयपीएलचाही चांगला अनुभव आहे. त्यांनी 2018 मध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि 2019 मध्ये कोलकाता नाइट रायडर्स (KKR) सोबत काम केले आहे.
2020 मध्ये केकेआर सोडल्यानंतर ते नॅशनल क्रिकेट अकादमीत सामील झाले. 2021 मधील ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील ‘इंडिया ए’ संघासोबतही ते क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून गेले होते. गेल्या 6 वर्षांपासून ते भारतीय क्रिकेट रचनेत सातत्याने सक्रिय आहेत.
कशी राहिली देशांतर्गत कारकीर्द?
शुभदीप घोष यांची खेळाडू म्हणून देशांतर्गत कारकीर्द फार मोठी नव्हती. आसाम आणि रेल्वे संघाकडून खेळताना त्यांनी 17 प्रथम श्रेणी आणि 17 लिस्ट-ए (List-A) सामने खेळले. यामध्ये त्यांनी अनुक्रमे 316 आणि 307 धावा केल्या. 2005 मध्ये त्यांनी आपला शेवटचा देशांतर्गत सामना खेळला होता.
टी. दिलीप यांची गच्छंती का झाली?
माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या कार्यकाळात टी. दिलीप यांना भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक बनवण्यात आले होते. मात्र, गेल्या काही काळात भारतीय संघाच्या क्षेत्ररक्षणाचा दर्जा घसरल्याचे पाहायला मिळाले. अलीकडेच पार पडलेल्या आयर्लंड, इंग्लंड आणि झिम्बाब्वे दौऱ्यात भारतीय खेळाडूंनी तब्बल 21 झेल सोडले. या खराब कामगिरीची दखल घेत बीसीसीआयने टी. दिलीप यांचा कार्यकाळ न वाढवता, त्यांच्या जागी सुभदीप घोष यांच्याकडे ही महत्त्वाची जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेतला.
हे ही वाचा –
Comments are closed.