नेमार क्लब फुटबॉलमध्ये खेळणार
ब्राझीलच्या फुटबॉलचा चेहरा, लाखो चाहत्यांच्या स्वप्नांचा हीरो आणि मैदानावरील जादूगार नेमार ज्युनियरने नुकतीच आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेतल्यानंतर अनेकांच्या डोळ्यांत पाणी आणले. विश्वचषकाचे स्वप्न अपूर्ण राहिल्यानंतर त्याने ब्राझीलच्या जर्सीला अखेरचा निरोप दिला. त्याच क्षणी फुटबॉलप्रेमींच्या मनात क्लब फुटबॉललाही नेमार रामराम ठोकणार का, असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र नेमारने तूर्तास क्लब फुटबॉल खेळणार असल्याचे संकेत दिले आहेत.
नेमारच्या क्लब फुटबॉलबद्दल अनेक प्रश्न सर्वांना पडत होते. त्याबद्दल सारेच आपले अंदाज वर्तवत होते. तेव्हा या साऱयांच्या मनातील धाकधूक संपवताना नेमार म्हणाला, मी सध्या क्लब फुटबॉलमधून निवृत्तीचा अजिबात विचार करत नाही. यावरून त्याने अजूनही फुटबॉलवरील प्रेम कायम असल्याचे दाखवून दिले आहे. डिसेंबरपर्यंत सॅण्टोस एफसीसोबतचा करार पूर्ण करायचा असून त्यानंतरच पुढील निर्णय घेईन, असेही त्याने सांगितले. थांबेन, दुसऱया क्लबमध्ये जाईन, खेळत राहीन की निवृत्त होईन… आज तरी मला स्वतःलाच माहीत नाही, या त्याच्या प्रामाणिक कबुलीने चाहत्यांना मात्र भावूक केले.
गेल्या काही वर्षांत नेमारला जखमांनी अक्षरशः पोखरून काढले. पोटरीच्या गंभीर दुखापतीमुळे त्याला अनेक महिने मैदानापासून दूर राहावे लागले. या दुखापतींचा फटका त्याच्या 2026 विश्वचषक मोहिमेलाही बसला. तरीही पुनरागमन करताना त्याने गोल केला आणि ब्राझीलच्या इतिहासात चार वेगवेगळ्या विश्वचषक स्पर्धांमध्ये गोल करणाऱया मोजक्या खेळाडूंमध्ये स्थान मिळवले.
सौदी अरेबियातील अल-हिलाल क्लब सोडल्यानंतर आपल्या बालपणीच्या सॅण्टोस एफसीमध्ये परतलेला नेमार आजही चाहत्यांसाठी तितकाच लाडका आहे. त्याचे ड्रिब्लिंग, अप्रतिम पास, गोल आणि चेहऱयावरचे हसू अजूनही फुटबॉलच्या चाहत्यांना मोहिनी घालतात.
Comments are closed.