वाड्याच्या भगत पाड्यातील आदिवासींच्या नशिबी 79 वर्षे ‘वनवास’; जीव धोक्यात घालून ग्रामस्थांना पार करावी लागते पिंजाळ नदी
वाडा व जव्हार तालुक्याच्या सरहद्दीवर पिंजाळ नदी तीरावर भगतपाडा हे गाव वसलेला आहे. या पाड्यावर शंभर कुटुंबे रहातात. येथील नागरिकांना वाडा या तालुक्याच्या ठिकाणी येण्यासाठी एक नदी पार करावी लागते. येथील पिंजाळ नदीवर सिंचनासाठी एक बंधारा बांधण्यात आला असून या बंधाऱ्याचाच आधार घेऊन या गावातील नागरिक येथून ये-जा करत असतात. येथील नदीला पूल नसल्याने पावसाळ्याचे चार महिने तर या पाड्याचा जगाशी संपर्क तुटलेला असतो.
या पाड्यात पहिली ते चौथी पर्यंत शाळा असून 25 विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. पावसाळ्यात शाळा बंदच आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. येथील काही विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आश्रम शाळांच्या वस्तीग्रहाचा आधार घ्यावा लागतो.
पावसाळ्याचे चार महिन्याचा किराणा सामान, औषधे, भाजीपाला आदी साहित्य येथील नागरिक मे महिन्याच्या अखेरीस आणून ठेवतात. एकदा नदी वाहायला लागली या पाड्याचा जगाशी संपर्क तुटलेला असतो.
गेल्या चार पिढय़ांपासून आम्ही इथे राहत असून अनेक सुविधांचा सामना आम्हाला करावा लागतो आहे. आमच्या जिवलगांना उपचारा अभावी प्राण सोडताना डोळ्यादेखत आम्ही बघतो आहोत, पण त्यासाठी आम्ही काही करू शकत नाही. मायबाप सरकारने आता तरी आमच्याकडे लक्ष द्यावे.
Comments are closed.