मतदारयादीच्या पुनरिक्षणात कराड दक्षिणची ‘शंभरनंबरी’ कामगिरी! पुणे विभागात प्रथम; महाराष्ट्रातील सातवा मतदारसंघ
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 30 जूनपासून सुरू झालेल्या विशेष सखोल पुनरीक्षण अभियानात मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱयांनी मतदारांच्या घरोघरी भेटी देत मतदार यादीतील नोंदींची प्रत्यक्ष पडताळणी केली. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात 342 मतदान केंद्रे असून, 3 लाख 3 हजार 202 मतदार नोंदणीकृत आहेत. यामध्ये 1 लाख 50 हजार 26 महिला, 1 लाख 53 हजार 142 पुरुष आणि 34 इतर मतदारांचा समावेश आहे.
विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले यांच्या आदेशानुसार आणि जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या नेतृत्वाखाली हे अभियान राबविण्यात आले. मतदारांच्या नोंदींची घरभेटीद्वारे तपासणी, माहितीची पडताळणी आणि आवश्यक त्या दुरुस्त्या करण्याची प्रक्रिया नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यात आली.
या मोहिमेत सातारा तहसीलदार रोहिणी शिंदे, कराडचे मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर, मलकापूरचे मुख्याधिकारी कपिल जगताप, सहायक गटविकास अधिकारी शैलेश पाटील, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी गणेश विभुते, निवासी नायब तहसीलदार बाबूराव राठोड, महसूल नायब तहसीलदार महेश उबारे यांच्यासह मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आणि विविध विभागांतील अधिकारी-कर्मचाऱयांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
दरम्यान, 8 ऑगस्टदरम्यान अनकलेक्टेबल फॉर्मची फेरपडताळणी, मॅपिंग न झालेल्या मतदारांची माहिती अद्ययावत करणे, नोंदींमधील त्रुटी दूर करणे आणि डिजिटाइज केलेल्या नोंदींची पुढील टप्प्यात तपासणी केली जाणार आहे. या प्रक्रियेमुळे मतदारयादी अधिक अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत होण्यास मदत होणार असल्याचे प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांनी सांगितले
Comments are closed.