एक खोटं बोलला अन् तिथेच फसला! स्टार अष्टपैलूवर 2 वर्षांची बंदी, पाकिस्तान क्रिकेट हादरलं; नेमकं
PCB Bans Pakistan Cric 2keter For Years : पाकिस्तान क्रिकेटमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) 27 वर्षीय अष्टपैलू क्रिकेटपटू हमजा नजर याच्यावर तब्बल दोन वर्षांसाठी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून बंदी घातली आहे. इतकंच नाही तर त्याच्यावर 10 लाख पाकिस्तानी रुपये इतका दंडही ठोठावण्यात आला आहे. व्हिसा अर्ज प्रक्रियेदरम्यान चुकीची माहिती दिल्याचा आरोप सिद्ध झाल्यानंतर पीसीबीने ही कठोर कारवाई केली.
व्हिसा अर्जात चुकीची माहिती देणं पडलं महाग (Pakistan Cricketer Hamza Nazar)
पीसीबीने या प्रकरणाची अंतर्गत चौकशी केली होती. चौकशीनंतर 6 ऑगस्ट रोजी बोर्डाने अधिकृतपणे निर्णय जाहीर केला. तपासात हमजा नजरने व्हिसा अर्ज करताना चुकीची किंवा दिशाभूल करणारी माहिती दिल्याचे समोर आले. त्यामुळे बोर्डाने त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करत दोन वर्षांची बंदी आणि आर्थिक दंड अशी शिक्षा सुनावली.
पाकिस्तान संघात निवडीची संधी हुकली (PCB Bans Hamza Nazar News)
हमजा नजर गेल्या काही काळापासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत होता. त्यामुळे वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी त्याची पाकिस्तानच्या कसोटी संघात निवड होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, व्हिसा प्रकरणामुळे त्याच्या सर्व आशांवर पाणी फिरले. संघात स्थान मिळण्याऐवजी त्याला दोन वर्षांची बंदी सहन करावी लागली.
PCB ची झिरो टॉलरन्स भूमिका
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना पीसीबीने स्पष्ट शब्दांत सांगितले की, अधिकृत कागदपत्रांमध्ये चुकीची, अपूर्ण किंवा दिशाभूल करणारी माहिती देणाऱ्या व्यक्तींविरोधात बोर्डाची ‘झिरो टॉलरन्स’ भूमिका आहे. बोर्डाच्या निवेदनात म्हटले आहे की, पाकिस्तान क्रिकेटशी संबंधित प्रत्येक खेळाडूने प्रामाणिकपणा आणि व्यावसायिकतेची सर्वोच्च पातळी कायम ठेवणे अपेक्षित आहे. चुकीची माहिती देणे किंवा माहिती लपवणे हे पाकिस्तान क्रिकेटचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूला अजिबात शोभणारे नाही.
हमजा नजरला स्पष्टीकरणाची संधी
सियालकोटमध्ये जन्मलेल्या हमजा नजरला चौकशीदरम्यान स्वतःची बाजू मांडण्याची संपूर्ण संधी देण्यात आली होती. मात्र, तीन सदस्यीय चौकशी समितीने त्याचे स्पष्टीकरण समाधानकारक नसल्याचे नमूद केले. उपलब्ध पुरावे आणि कागदपत्रांच्या आधारे त्याच्यावर दोन वर्षांच्या बंदीचा निर्णय घेण्यात आला.
हमजा नजरने 2014 मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तो ऑफ-स्पिन गोलंदाजी करणारा अष्टपैलू क्रिकेटपटू आहे. यावर्षी प्रेसिडेंट्स ट्रॉफी ग्रेड-1 स्पर्धेत खान रिसर्च लॅबोरेटरीजकडून खेळताना पाकिस्तान टेलिव्हिजनविरुद्ध त्याने सातव्या क्रमांकावर फलंदाजी करत 202 चेंडूत नाबाद 175 धावांची शानदार खेळी केली होती. ही त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी मानली जाते. याआधी घनी ग्लासविरुद्धच्या सामन्यात त्याने चार विकेट्स घेतल्या आणि 71 धावांची महत्त्वपूर्ण खेळी करून अष्टपैलू कामगिरीची झलक दाखवली होती.
Comments are closed.