अमेरिकेत वणवा विझवताना हेलिकॉप्टर कोसळले, दोन वैमानिकांचा दुर्दैवी मृत्यू
सेव्हियर काउंटीच्या शेरीफ यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘फिशलेक नॅशनल फॉरेस्ट’मध्ये लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी हे सिकोरस्की स्कायक्रेन हेलिकॉप्टर मदतकार्य करत होते. त्याचवेळी हे हेलिकॉप्टर खाली कोसळल्याने ही भयंकर दुर्घटना घडली. या अपघातामुळे जंगलात आणखी एक नवीन आग लागली आणि ती मूळ वणव्याला जाऊन मिळाली, ज्यामुळे आतापर्यंत सुमारे १७४ चौरस मैलांचा (सुमारे ४५१ चौरस किलोमीटर) परिसर जळून खाक झाला आहे.
सुरुवातीला आगीच्या उग्र स्वरूपामुळे बचाव पथकांना अपघातग्रस्त ठिकाणी पोहोचणे कठीण जात होते. मात्र, थोड्या वेळाने परिस्थिती नियंत्रणात आल्यावर बचाव पथकाने घटनास्थळी पोहोचून दोन्ही वैमानिकांच्या मृत्यूला दुजोरा दिला. अमेरिकन वनविभागाने कंत्राट दिलेल्या हेलिकॉप्टर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस या कंपनीचे हे दोन्ही वैमानिक कर्मचारी होते. अधिकाऱ्यांनी अद्याप या मृत वैमानिकांची नावे उघड केलेली नाहीत.
Comments are closed.