गणेशभक्तांवर भाडेवाढीचे विघ्न ग्रुप बुकिंगवर 30 टक्के दरवाढ, ऐन उत्सवात महागाईचा वरवंटा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

गौरी-गणपती सणासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना यंदा ‘लालपरी’चा प्रवास महागडा ठरणार आहे. अलीकडेच एसटीच्या तिकीट दरात 13.5 टक्क्यांची मोठी भाडेवाढ करण्यात आली. त्यापाठोपाठ महामंडळाने सोमवारी एसटीच्या ग्रुप बुकिंगवर 30 टक्क्यांची जादा भाडेआकारणी करण्याचा निर्णय जाहीर केला. एसटीच्या लागोपाठच्या भाडेवाढीमुळे यंदा गणेशभक्तांचा कोकण प्रवास 43.50 टक्क्यांनी महागणार आहे.

इंधन दरवाढीमुळे आर्थिक गणित कोलमडल्याने एसटी महामंडळाने अलीकडेच तिकीट दरात 13.5 टक्क्यांची भाडेवाढ केली. ही कायमस्वरूपी भाडेवाढ केली असताना गणेशोत्सव काळात ग्रुप बुकिंगवर अतिरिक्त भाडेवसुलीचा भार पडणार नाही, अशी अपेक्षा गणेशभक्त बाळगून होते, मात्र सोमवारी तब्बल 30 टक्के अतिरिक्त भाडेआकारणीचे परिपत्रक जारी करीत एसटी महामंडळाने हजारो गणेशभक्तांना मोठा धक्का दिला. एकेरी पद्धतीने आरक्षित केल्या जाणाऱ्या ग्रुप बुकिंगकरिता एकेरी प्रवास भाडय़ाऐवजी अतिरिक्त 30 टक्के भाडेआकारणी करण्याचे निर्देश महामंडळाने प्रादेशिक व्यवस्थापक तसेच एसटीच्या सर्व विभाग नियंत्रकांना जारी केले. एकेरी पद्धतीच्या ग्रुप बुकिंगमुळे बहुतांशी बसेस रिकाम्या मार्गस्थ कराव्या लागतात. त्यात आर्थिक नुकसान होत असल्याचे कारण एसटी महामंडळाने दिले आहे. या निर्णयाची अंमलबजावणी सोमवारपासूनच सुरू करण्यात आली.

एसटी प्रवाशांची सेवा करते की ओरबाडते?

गणेशभक्तांवर अतिरिक्त भाडेवाढीचा भुर्दंड लादण्याच्या एसटी महामंडळाच्या निर्णयावर संताप व्यक्त केला जात आहे. एकीकडे परिवहन मंत्री नफा-तोटा याचा विचार न करता प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एसटी कटिबद्ध असल्याचे सांगतात, मात्र दुसरीकडे एसटीचे अधिकारी गणेशभक्तांना 43.50 टक्क्यांच्या भाडेवाढीची भेट देत आहेत. एसटी प्रवाशांची सेवा करतेय की प्रवाशांना ओरबाडतेय, असा संतप्त सवाल गणेशभक्त कोकणवासीय प्रवासी संघाचे कार्याध्यक्ष दीपक चव्हाण यांनी उपस्थित केला.

Comments are closed.