अभिषेक बॅनर्जी यांच्या परदेश दौऱ्याला परवानगी.

सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा

► वृत्तसंस्था

नवी दिल्ली

पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे आणि तृणमूल काँग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी यांना वैद्यकीय उपचारांसाठी परदेशी जाण्याची अनुमती सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे. सरन्यायाधीश सूर्य कांत, न्या. जॉयमाला बागची आणि न्या. व्ही. मोहना यांच्या खंडपीठाने ही अनुमती सोमवारी एका आदेशाद्वारे दिली आहे. कलकत्ता उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली होती. तथापि, सर्वोच्च न्यायालयाने त्यांना दिलासा दिला आहे. प्रत्येकाला विदेशी जाण्याचा अधिकार आहे. तसेच प्रत्येकाला त्याच्या इच्छेप्रमाणे वैद्यकीय उपचारांचे स्थान निवडण्याचा अधिकार आहे, अशी टिप्पणी न्यायालयाने आपल्या आदेशात केली.

न्यायालयाने बॅनर्जी यांना विदेशी जाण्याची मुभा देताना महत्वाच्या अटी घातल्या आहेत. त्यांनी आपल्या विदेशवारीच्या कारणांची सविस्तर माहिती केंद्र सरकारला दिली पाहिजे. कोणत्या देशात उपचार घेणार, तसेच उपचारांसाठी त्या देशात कोठे वास्तव्य करणार, कोणत्या डॉक्टरांकडून किंवा कोणत्या रुग्णालयात उपचार घेतले जाणार आहेत, विदेशात किती काळ त्यांचे वास्तव्य आहे आणि कोणत्या विमानाने ते विदेशी जाणार आहेत, याची सर्व माहिती बॅनर्जी यांनी केंद्र सरकारला देश सोडण्याआधी द्यावी, असा आदेश न्यायालयाकडून दिला गेला आहे.

राजनैतिक पासपोर्टवर जाणार

विदेशगमन आपण आपल्या राजनैतिक पासपोर्टवर करणार आहोत. आपला व्यक्तीगत पासपोर्ट केंद्र सरकार ठेवून घेऊ शकते, असा युक्तिवाद बॅनर्जी यांच्या वतीने करण्यात आला. मात्र, त्यांच्या विरोधात 15 गंभीर प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यांना विदेशी जाण्याची मुभा देण्यात आली, तर ते भारतात परत न येण्याची शक्यता आहे, असा युक्तिवाद अतिरिक्त महाधिवक्ता एस. व्ही. राजू यांनी केला. तथापि, सर्वोच्च न्यायालयाने सरकारकडून करण्यात आलेला युक्तिवाद न मानता, कलकत्ता उच्च न्यायालयाने दिलेला आदेश रद्द करत त्यांच्या विदेशवारीला अनुमती दिली. चार महिन्यांपूर्वी झालेल्या पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचा दारुण पराभव झाला होता. त्यानंतर अभिषेक बॅनर्जी यांच्यासाठी आव्हानात्मक काळ आला असून त्यांनी त्यांच्या सत्ताकाळात केलेल्या अनेक कृत्यांसंबंधी त्यांच्यावर अनेक प्रकारणे न्यायालयात सादर करण्यात आली आहेत.

Comments are closed.