इंदिरा गांधी हत्याप्रकरणातील दोषीचा मुलगा पंजाबमध्ये निवडणूक लढवणार; अमृतपाल सिंग यांनी उमेदवारी जाहीर केलेले सतवंत सिंग कोण? – TMarathiNews

चंदीगड : पंजाबमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी तयारीला वेग दिला आहे. उमेदवारांच्या नावांवर चर्चा सुरू असतानाच अमृतपाल सिंह यांच्या ‘अकाली दल (वारिस पंजाब दे)’ पक्षाने पहिल्या उमेदवाराची घोषणा केली आहे. पक्षाने सतवंत सिंह यांना फतेहगढ साहिब जिल्ह्यातील बस्सी पठाना विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. सतवंत सिंह हे केहर सिंह यांचे पुत्र आहेत. केहर सिंह यांना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येच्या कटात दोषी ठरवून १९८९ मध्ये फाशी देण्यात आली होती.

६१ वर्षीय सतवंत सिंह हे बस्सी पठाना मतदारसंघातील मुस्तफाबाद गावचे रहिवासी असून ते बँकेतून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांची ही पहिलीच विधानसभा निवडणूक असणार आहे. अमृतसर येथे झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ‘वारिस पंजाब दे’चे कार्यकारी अध्यक्ष तरसेम सिंह आणि फरीदकोटचे खासदार सरबजीत सिंह खालसा यांनी त्यांच्या उमेदवारीची घोषणा केली.

इंदिरा गांधी हत्या प्रकरणाशी कुटुंबाचा संबंध

सतवंत सिंह यांचे वडील केहर सिंह यांना १९८४ मध्ये झालेल्या इंदिरा गांधी हत्या प्रकरणात कटात सहभागी असल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले होते. ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांचे अंगरक्षक बेअंत सिंह आणि सतवंत सिंह यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. ऑपरेशन ब्लू स्टारनंतर सूडाच्या भावनेतून ही हत्या करण्यात आल्याचे सांगितले जाते. केहर सिंह यांना या हत्येच्या कटातील प्रमुख सूत्रधारांपैकी एक मानण्यात आले होते. ६ जानेवारी १९८९ रोजी तिहार कारागृहात त्यांना फाशी देण्यात आली.

२०२४ मध्ये सरबजीत सिंह खालसांचा केला होता प्रचार

सतवंत सिंह यांच्या कुटुंबाचा राजकीय क्षेत्राशीही संबंध राहिला आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी फरीदकोट मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणाऱ्या सरबजीत सिंह खालसा यांच्या प्रचारात सहभाग घेतला होता. सरबजीत सिंह खालसा हे इंदिरा गांधी यांच्या हत्येत सहभागी असलेल्या बेअंत सिंह यांचे पुत्र आहेत.

‘वारिस पंजाब दे’चे कार्यकारी अध्यक्ष तरसेम सिंह यांनी सांगितले की, पक्षाचा उद्देश केवळ राजकीय सत्ता मिळवणे नसून पंजाबचे अधिकार तसेच समुदायासाठी बलिदान देणाऱ्या कुटुंबांचा सन्मान आणि त्यांना प्रतिनिधित्व देणे हा पक्षाच्या अजेंड्याचा भाग आहे.

पक्षावर काही काळापासून बलिदानाशी संबंधित कुटुंबांपासून दूर जात असल्याची टीका होत होती. मात्र, सतवंत सिंह यांना उमेदवारी देणे हे या आरोपांना उत्तर असल्याचे पक्षाने म्हटले आहे. सतवंत सिंह यांचे पुतणे सुखविंदर सिंह अगवान यांचाही पक्षाच्या संसदीय मंडळात समावेश करण्यात आला आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत पंजाबचे प्रादेशिक अधिकार, शीख राजकीय कैद्यांचे प्रश्न आणि प्रमुख पंथक कुटुंबांना राजकीय प्रतिनिधित्व देणे या मुद्द्यांवर पक्षाचा प्रचार केंद्रित राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

दिब्रुगड तुरुंगत अमृतपाल सिंग

‘वारिस पंजाब दे’चे प्रमुख अमृतपाल सिंह यांनी २०२४ ची लोकसभा निवडणूक तुरुंगात असतानाच लढवली होती. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार कुलबीर सिंह जीरा यांचा सुमारे १.९७ लाख मतांनी पराभव केला होता. तुरुंगात असताना लोकसभा निवडणूक जिंकणारे ते देशातील पहिले खासदार ठरले.

अमृतपाल सिंह सध्या आसाममधील डिब्रूगड केंद्रीय कारागृहात बंद आहेत. २०२३ मध्ये अजनाला पोलीस ठाण्यावर झालेल्या हिंसक हल्ल्याप्रकरणी तसेच राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या (NSA) उल्लंघनाच्या आरोपांखाली त्यांना अटक करण्यात आली होती.

Comments are closed.