राहुल गांधी हे अप्रामाणिक नेते आहेत.

माजी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा आरोप

वृत्तसंस्था

नवी दिल्ली

‘जंतरमंतर’ वरील आंदोलनाचे मोठे भांडवल राहुल गांधी यांनी केले आहे. तथापि, ते झारखंड येथील विद्यार्थ्यी आंदोलनासंबंधी मूग गिळून गप्प आहेत. यावरुन ते किती खोटारडे नेते आहेत, हे स्पष्ट होत आहे, असा हल्लाबोल माजी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केला आहे. मंगळवारी त्यांनी ‘एक्स’ या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर संदेश प्रसारीत करत गांधी यांच्यावर हा आरोप केला.

राहुल गांधी विद्यार्थ्यांचा नेता असल्याचा आव आणीत आहेत. तथापि, त्यांनी विद्यार्थीवर्गाची सरसकट फसवणूक चालविली आहे. केंद्र सरकार नीट-युजी आणि जंतरमंतरवरील आंदोलन या मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्यास सज्ज आहे. तथापि, राहुल गांधी यांना चर्चा करण्यात किंवा केंद्र सरकारचे म्हणणे ऐकून घेण्यात कोणतेही स्वारस्य नाही. त्यांना केवळ विद्यार्थ्यांचा उपयोग एक राजकीय शस्त्र म्हणून स्वत:च्या स्वार्थासाठी करुन घ्यायचा आहे. त्यांची संसदेत येऊन ऐकण्याची इच्छा नाही. त्यांना आणि काँग्रेसला पुराव्यांशिवाय आरोप करण्याची सवय आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधात त्यांनी केलेले आरोप तथ्यहीन आणि बिनबुडाचे आहेत. राजकीय नैराश्यापोटी ते असे आरोप करतात. त्यांचा पक्षही त्यांची री ओढतो, अशी टीका त्यांनी राहुल गांधी आणि काँग्रेस यांच्यावर केली.

सरकार चर्चेसाठी सज्ज

कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करण्यास केंद्र सरकार सज्ज आहे. त्याने तसे वारंवार स्पष्ट केले आहे. विरोधी पक्षांनी संसदेत शांतता राखली, तर आम्ही त्यांच्या सर्व शंकांचे समाधान करण्यास सक्षम आहोत. तथापि, आपले पितळ उघडे पडू नये, म्हणून काँग्रेस संसदेचे कामकाजच होणार नाही, याची दक्षता घेत आहे. ही वृत्ती लोकशाहीघातक असून काँग्रेसचाही त्यात लाभ नाही, असा इशारा त्यांनी दिला.

झारखंडचे काय…

झारखंडमध्ये विद्यार्थ्यांनी त्या राज्यातील शिक्षण क्षेत्रात चाललेल्या प्रचंड भ्रष्टाचाराच्या विरोधात आंदोलन चालविले आहे. तथापि, राहुल गांधी तेथे जात नाहीत. कारण, त्या राज्यात त्यांचा पक्ष सत्तेत सहभागी आहे. ज्या राज्यांमध्ये आपली सत्ता आहे, तेथील गैरप्रकारांसंबंधी गांधी काहीही बोलत नाहीत. यातून त्यांचा दुटप्पीपणा स्पष्ट होत आहे. या देशातील तरुणाई राहुल गांधी यांचा हा दुतोंडीपणा पहात आहे. भारतातील जनता त्यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, हे राहुल गांधी यांनी ध्यानात ठेवावे, अशा अर्थाचा इशाराही त्यांनी दिला.

Comments are closed.