NEET च्या विरोधात तामिळनाडू सरकारचे पाऊल

द्रमुकने देखील साथ : विधानसभेत नीट संपुष्टात आणण्याचा प्रस्ताव संमत

तामिळनाडूच्या विजय सरकारने मंगळवारी विधानसभेत नीट समाप्त करणे आणि पदवीस्तरीय वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी 12 वीच्या गुणांना आधार क रण्याची मागणी करणारा प्रस्ताव संमत करविला आहे. आरोग्यमंत्री के.जी. अरुणराज यांच्याकडून मांडण्यात आलेल्या प्रस्तावात नीट सामाजिक न्याय आणि समानतेच्या विरोधात आहे तसेच वैद्यकीय शिक्षणाप्रकरणी राज्यांच्या अधिकारांना प्रभावित करत असल्याचे प्रस्तावात म्हटले गेले आहे.

वृत्तसंस्था, चेन्नई

प्रस्तावाला द्रमुक, अण्णाद्रमुक, पीएमके आणि डाव्या पक्षांनी समर्थन दर्शविले. तर भाजपचे एकमात्र आमदार भोजराजन यांनी या प्रस्तावाला विरोध करत सभात्याग केला आहे. नीट सामाजिक न्याय आणि समानतेच्या तत्वांच्या विरोधात असल्याची भूमिका राज्य सरकारने सातत्याने घेतली आहे. नीट तमिळ माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत ग्रामीण आणि सामाजिक-आर्थिक स्वरुपात वंचित वर्गांच्या विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय शिक्षण मिळविण्याच्या संधींना गंभीर रुपात प्रभावित करत असल्याचा दावा अरुणराज यांनी विधानसभेत बोलताना केला आहे.

12 वीचे गुण ठरावेत आधार

तामिळनाडू विधानसभेत संमत प्रस्तावात केंद्र सरकारकडे नीट समाप्त करणे आणि पदवी वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी 12 वीच्या गुणांना आधार करण्याची व्यवस्था लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी एक दिवसाच्या परीक्षेला विद्यार्थ्यांच्या 12 वर्षांच्या शालेय शिक्षणावर निर्णायक ठरविले जाऊ नये असा सरकारचा युक्तिवाद आहे.

पेपरलीकमुळे विश्वासाला तडा

आरोग्यमंत्री अरुणराज यांनी नीट विरोधी प्रस्तावात परीक्षेशी निगडित वादांचाही उल्लेख केला. पेपर लीक, युवांच्या आत्महत्या अन् विद्यार्थ्यांच्या विश्वासाला तडा गेल्यासारखे मुद्दे त्यांनी उपस्थित पेले. 12 वर्षांच्या शालेय शिक्षणाऐवजी एक दिवस आयोजित होणारी नीट परीक्षा विद्यार्थ्यांच्या उच्चशिक्षणाचे भविष्य निश्चित करते हे योग्य आहे का असे प्रश्नार्थक विधान अरुणराज यांनी केले आहे.

विरोधकांकडून समर्थन

विधानसभेत प्रस्तावावरील चर्चेदरम्यान द्रमुक, अण्णाद्रमुक, पीएमके आणि डाव्या पक्षांच्या आमदारांनी याचे समर्थन पेले. चर्चेनंतर सभागृहाने नीट समाप्त करण्याची मागणी करणारा प्रस्ताव संमत केला आहे.

भाजप आमदाराचा विरोध

प्रस्तावाला भाजप आमदार भोजराजन यांनी विरोध केला आहे. ते प्रस्तावाच्या विरोधात उभे ठाकले आणि नंतर सभागृहातून बाहेर पडण्याचा निर्णय त्यांनी घेतला. यामुळे या प्रस्तावाला विरोध करणारा राज्यात केवळ भाजप हा एकच पक्ष ठरला आहे.

नीट समाप्त करण्याची मागणी

तामिळनाडू विधानसभेच्या या प्रस्तावाचा मुख्य आधार नीटवरून राज्य सरकारच्या दीर्घकाळापासून असलेला आक्षेप आहे. वैद्यकीय शिक्षणात प्रवेशासाठी वर्तमान व्यवस्था सामाजिक न्याय, समान संधी आणि राज्यांच्या अधिकारांच्या अनुरुप नसल्याचे राज्य सरकारचे म्हणणे आहे. या प्रस्तावाद्वारे केंद्र सरकारकडे नीट समाप्त करत 12 वीच्या गुणांच्या आधारावर पदवी वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशाची व्यवस्था सुरू करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

नीटवरून मोठी निदर्शने

यापूर्वी नीट पेपर लीकच्या विरोधात मागील महिन्यात दिल्लीच्या जंतर-मंतर येथे एक मोठे आंदोलन सुरु झाले होते. कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात पेपर लीकवरून सरकारचे उत्तरदायित्व निश्चित करण्याची मागणी केली जात होती. तेथील निदर्शने उग्र झाल्यावर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी स्वत:च्या पदाचा राजीनामा दिला होता. तर सरकारने कठोर कारवाई करत विविध परीक्षांमध्ये पेपर लीक रोखण्यासाठी कायदा आणखी कठोर केला आहे.

 

Comments are closed.