Ajinkya Rahane – निवृत्तीनंतर अजिंक्य रहाणे आता नव्या भूमिकेत

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

टीम इंडियाचा माजी फलंदाज अजिंक्य रहाणे आता नव्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. अजिंक्य रहाणे याने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर आता अजिंक्य नवीन भूमिकेत चाहत्यांना भेटणार आहे. श्रीलंकेविरुद्धच्या आगामी दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेदरम्यान अजिंक्य रहाणे समालोचन करणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट समालोचन करण्याची ही त्याची प्रथमच वेळ असणार आहे.

१५ ऑगस्टपासून गॉल येथे सुरू होणाऱ्या या मालिकेसाठी तो सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या समालोचन पॅनेलमध्ये सहभागी होणार आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर जवळपास १८ वर्षांची कारकीर्द नुकतीच संपवलेल्या रहाणेने आता ही नवी भूमिका स्वीकारली असून, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपला अनुभव तो प्रसारणातून मांडणार आहे.

३७ वर्षांच्या रहाणेने टीम इंडियासाठी ८५ कसोटी सामने खेळताना ३८.४६ च्या सरासरीने ५,०७७ धावा केल्या. त्यात १२ शतके आणि २६ अर्धशतके आहेत. त्याने २०२०-२१ मध्ये ऑस्ट्रेलियात टीम इंडियाला कसोटी मालिका विजय मिळवून दिला होता आणि मधल्या फळीतील फलंदाज म्हणून परदेशातील अनेक विजयांमध्ये त्याचा महत्त्वाचा सहभाग राहिला आहे.

‘टीम इंडियाच्या श्रीलंका दौऱ्यासाठी कसोटी समालोचनात पदार्पण करताना मला खूप उत्साह वाटत आहे. कसोटी क्रिकेट हे या खेळाचे सर्वोच्च शिखर आहे आणि अनेक वर्षे या प्रकारात टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केल्यानंतर आता या खेळाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची संधी मिळणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे’, अशी प्रतिक्रिया रहाणेने प्रसिद्धीपत्रकातून दिली आहे.

” तेव्हा मी ढसाढसा रडलो…”, निवृत्तीचा निर्णय घेताच अजिंक्य रहाणेला पहिला फोन कुणाचा आला?

‘या खेळातील माझे अनुभव सांगण्यास, खेळातील बारकावे समजावून सांगण्यास आणि कसोटी सामन्याचे रूप बदलू शकणारे निर्णय, रणनीती आणि क्षण याबाबत चाहत्यांना माहिती देण्यास मी उत्सुक आहे. चाहत्यांसाठी प्रसारणाचा अनुभव अधिक समृद्ध करणे आणि मैदानावर नेमके काय घडते याची त्यांना अधिक सखोल समज देणे, अशी माझी भूमिका असेल’, असे रहाणेने या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

Comments are closed.