VIDEO: 20 षटकार, 443 धावा….अँड्र्यू फ्लिंटॉफच्या मुलाची भन्नाट बॅटिंग! 136 वर्षांचा विक्रम मोडत रचला इतिहास

इंग्लंडचा दिग्गज अष्टपैलू अँड्र्यू फ्लिंटॉफ याच्या मुलाने स्थानिक क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे. रॉकी फ्लिंटॉफने वनडे कप 2026 स्पर्धेत लँकशायरकडून खेळताना सोमरसेटविरुद्ध उल्लेखनीय खेळी केली. 18 वर्षीय रॉकीने लँकशायरच्या क्रिकेट इतिहासात जवळपास 136 वर्षांपासून ज्यांना जमले नाही, ते साध्य केले आहे.

रॉकीने सोमरसेटविरुद्ध 76 चेंडूंमध्ये 10 चौकार आणि 7 षटकारांच्या सहाय्याने 123 धावा केल्या. त्यामुळे तो लँकशायरच्या वरिष्ठ संघासाठी शतकी खेळी करणारा सर्वात युवा फलंदाज ठरला आहे. हा पराक्रम करताना त्याने आर्ची मॅकलारेनचा 136 वर्ष जुना विक्रम मोडला.

रॉकीच्या वादळी शतकामुळे लँकशायरने 50 षटकांत 6 विकेट्स गमावत 443 धावसंख्या उभारली. तसेच त्याने चौथ्या विकेटसाठी कीटन जेनिंग्जसोबत 214 धावांची भागीदारी केली. सलामीवीर जेनिंग्जनेही 127 चेंडूंत 15 चौकार आणि 7 षटकारांच्या सहाय्याने 156 धावा केल्या. हा सामना लँकशायरने 174 धावांनी जिंकला.

रॉकीचे शतक लक्षवेधी का?
रॉकी लँकशायरच्या प्रथम श्रेणी संघासाठी शतकी खेळी करणारा सर्वात युवा फलंदाज ठरला. मॅकलारेनने 1890 मध्ये वयाच्या 18 वर्ष आणि 256 दिवसांचा असताना 106 धावा केल्या होत्या. आता त्यानंतर थेट रॉकीने ही कामगिरी केली आहे, मात्र त्याने ही कामगिरी अवघ्या वयाच्या 18 वर्ष आणि 126 दिवसांनी केली आहे.

रॉकीचा सहकारी जेनिंग्जने सामन्यानंतर म्हटले, “एका क्रिकेट कुटुंबातून आल्याने त्याच्यावर दबाब होता, मात्र त्याला ही जाणीव होती की त्याचे कुटुंब काही त्या धावा करू शकत नाही. त्याला स्वत:लाच मैदानावर कामगिरी करावी लागेल.”

उत्तम फिटनेस आणि शांत स्वभावाच्या रॉकीने इंग्लंडच्या 19 वर्षाखालील संघासाठीही शतके केली आहेत. 2025 मध्ये, त्याने आपल्या वडिलांनी प्रशिक्षण दिलेल्या इंग्लंड लायन्स संघाकडून क्रिकेट ऑस्ट्रेलिया इलेव्हनविरुद्ध शतक केले होते.

Comments are closed.