वनडे फॉरमॅट वाचवण्यासाठी आयसीसीची मोठी योजना! द्विपक्षीय टी-20 मालिका बंद होणार?

टी-20 क्रिकेटची सुरवात होऊन जवळपास दोन दशके झाली आहेत आणि जगभरात त्याची प्रचंड लोकप्रियता पाहायला मिळते. याच कारणामुळे आजकाल क्रिकेट खेळणाऱ्या जवळपास प्रत्येक मोठ्या देशात स्वतःची टी20 फ्रँचायझी लीग सुरू आहे. याचा वाईट परिणाम वनडे (ODI) आणि कसोटी (Test) क्रिकेटवर झाला असून, चाहते या दोन्ही फॉरमॅट्समध्ये पूर्वीप्रमाणे रस दाखवत नाहीत. अशा परिस्थितीत, आयसीसी (ICC) आता कसोटी आणि वनडे सामन्यांच्या भविष्यासाठी मोठी योजना आखत आहे. यावर आयसीसीचे सीईओ संजोग गुप्ता (Sanjog gupta) यांचे एक मोठे वक्तव्य समोर आले आहे.

संजोग गुप्ता यांनी म्हटले आहे की, विनाकारण खेळवल्या जाणाऱ्या टी-20 मालिकांना कोणतेही भवितव्य नाही आणि त्या लवकरच बंद होतील. पीटीआय (PTI) वृत्तसंस्थेशी बोलताना आयसीसीचे सीईओ संजोग गुप्ता म्हणाले की, कोणताही उद्देश किंवा संदर्भ नसलेल्या द्विपक्षीय क्रिकेट मालिकांचा काळ आता संपला पाहिजे. यामुळे वनडे क्रिकेट केवळ अस्तित्त्व टिकवून पुरते मर्यादित राहणार नाही, तर भविष्यात ते अधिक मजबूत होईल.

क्रिकेटच्या सर्व फॉरमॅट्समध्ये वनडेचे स्वतःचे एक स्पष्ट आणि महत्त्वाचे स्थान आहे, जे विशेषतः पुरुष आणि महिलांच्या आयसीसी क्रिकेट विश्वचषकाशी जोडलेले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कसोटी फॉरमॅट्सप्रमाणेच आयसीसी पुढील विश्वचषकापूर्वी वनडेसाठी एक स्वतंत्र वेळ तयार करण्याचा विचार करत आहे, जेणेकरून या फॉरमॅट्सलाही योग्य महत्त्व मिळेल.

आयसीसी सीईओ संजोग गुप्ता पुढे म्हणाले की, क्रिकेटने टेनिसमधील ‘विम्बल्डन’ आणि गोल्फमधील ‘द मास्टर्स’ सारख्या प्रतिष्ठित स्पर्धांकडून शिकले पाहिजे. या स्पर्धांनी बदलाच्या या काळातही आपल्या खेळाची वर्षानुवर्षांची परंपरा टिकवून ठेवली आहे आणि आजही चाहते या स्पर्धांमध्ये मोठ्या प्रमाणावर रस घेतात.

जागतिक स्तरावर क्रिकेटला पुढे नेण्यासाठी सध्या टी-20 क्रिकेट हे सर्वात प्रभावी माध्यम आहे, परंतु याचा अर्थ असा नाही की वनडे आणि कसोटी क्रिकेटच्या विकासाकडे दुर्लक्ष केले जावे. काही देशांमध्ये कसोटी क्रिकेटच्या चाहत्यांचा वर्ग अतिशय मजबूत आहे, परंतु गरज या गोष्टीची आहे की, सदस्य देशांनाही अशा संधी मिळायला हवी, ज्यामुळे त्यांच्या देशात कसोटी सामने मोठ्या आणि महत्त्वाच्या स्पर्धा म्हणून आयोजित केल्या जाऊ शकतील.

Comments are closed.