मुंबईत अडीचशे ठिकाणी दरडींचा धोका, शेकडो कुटुंबांचा जीव टांगणीला; ४६ स्पॉट अतिधोकादायक, ७४ धोकादायक
कुर्ल्यामध्ये दरड कोसळून सात जणांचा मृत्यू झाल्यामुळे मुंबईतील धोकादायक दरडींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मुंबईत सद्यस्थितीत तब्बल २४९ धोकादायक दरडींच्या ठिकाणी वस्ती आहे. यातील ४६ ठिकाणे अतिधोकादायक, तर ७४ ठिकाणे धोकादायक आहेत. त्यामुळे या ठिकाणी राहणाऱ्या शेकडो कुटुंबांचा जीव टांगणीला लागला आहे. अतिधोकादायक दरडींजवळ राहणाऱ्या कुटुंबांना नोटीस बजावूनही अनेकांनी स्थलांतरणास नकार दिल्याने धोका कायम आहे.
दरड कोसळून होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून नियमितपणे संबंधित ठिकाणी तपासणी करून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येतो. या सर्वेक्षणात २४९ ठिकाणी दरडींचा धोका असल्याचे समोर आले आहे. यातील ७४ ठिकाणे धोकादायक, तर ४६ ठिकाणे अतिधोकादायक आहेत. यामध्ये सहा ठिकाणे मुंबई शहर विभागात, तर उर्वरित ४० ठिकाणे पूर्व आणि पश्चिम उपनगरात आहेत. आज दुर्घटना घडलेल्या कुर्ल्यामध्ये तब्बल १३ ठिकाणी दरडी कोसळण्याचा धोका आहे. मात्र आज दुर्घटना घडलेले ठिकाण धोकादायक दरडींच्या यादीत नव्हते, अशी माहितीही समोर आली आहे.
अशी होते कार्यवाही…
धोकादायक दरडींच्या ठिकाणी राहणाऱ्या रहिवाशांना पावसाळ्याआधी पालिकेडून नोटीस बजावून सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात सांगितले जाते. रहिवाशांना काळजी घेण्यासाठी प्रशिक्षणही देण्यात येते. शिवाय धोकादायक दरडींच्या ठिकाणी जनजागृती करणारे, धोक्याचे फलक लावले जातात. शिवाय संरक्षक भिंत बांधणे, पाण्याच्या प्रवाहातील अडथळे दूर करणे, कचरा उचलणे, झाडांची धोकादायक फांद्या तोडणे अशी कार्यवाही केली जाते. दुर्दैवाने दरड कोसळल्यास त्या ठिकाणच्या रहिवाशांच्या वास्तव्याचा प्रश्न निर्माण होत असल्याने पालिकेच्या माध्यमातून शेल्टर रूमची व्यवस्था केली जाते.
Comments are closed.