श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारत 3 फिरकीपटूंसह मैदानात उतरणार, प्रशिक्षकांनी दिले संकेत

भारत आणि श्रीलंका दरम्यान दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतला पहिला कसोटी सामना शनिवार, 15 ऑगस्टपासून गॉल येथे खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी गॉलच्या खेळपट्टीची जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान, भारतीय क्रिकेट संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्नी मॉर्केल यांनी संकेत दिले आहेत की, पहिल्या कसोटीत टीम इंडिया तीन फिरकीपटूंसह मैदानात उतरू शकते. अशा परिस्थितीत भारतीय प्लेइंग इलेव्हनमध्ये कुलदीप यादव, रवींद्र जडेजा आणि मानव सुतार ही त्रिमूर्ती ॲक्शनमध्ये दिसू शकते.
टीम इंडियाचे बॉलिंग कोच मॉर्नी मॉर्केल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले, “कुलदीप आमच्यासोबत आहे आणि तो एक आक्रमक गोलंदाज आहे. त्याचा अनुभव आणि दर्जा आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. माझ्या मते हे सगळे आपापल्या परीने वेगळे आहेत. एक चेंडू थोडा जास्त टर्न करतो, एक जरा जास्त अचूक आहे आणि मला वाटत नाही की तीन डाव्या हाताचे फिरकीपटू असणे ही आमच्यासाठी काही मोठी चिंता आहे. हे यावर अवलंबून असेल की शुभमन गिल ठराविक वेळी या गोलंदाजांचा कसा वापर करतो. पण कौशल्याचा विचार केला तर या सर्वांमध्ये आमच्यासाठी २० विकेट्स घेण्याची क्षमता आहे.”
मॉर्केल म्हणाले की, भारताचे स्पिन आक्रमण त्यांना अत्यंत आक्रमक पर्याय देते, विशेषतः गॉलची खेळपट्टी पाहता; ज्यावर सामना जसा पुढे जाईल तशी फिरकीपटूंना मदत मिळण्याची अपेक्षा आहे. ते पुढे म्हणाले, जर तुम्ही पारंपारिकपणे हे मैदान पाहिले आणि इथे सामने कसे खेळले गेले आहेत हे पाहिले, तर मला वाटते की तीन फिरकीपटूंसह मैदानात उतरणे हाच योग्य मार्ग आहे. आमचे स्पिन आक्रमण पाहिले तर हा एक अतिशय आक्रमक पर्याय आहे.
भारतीय गोलंदाजी प्रशिक्षकांनी सांगितले की, मला ही एक चांगली खेळपट्टी वाटतेय आणि माझा असा विश्वास आहे की कसोटी सामना पुढे सरकेल तसे यात काही बदल पाहायला मिळतील. संघाने सर्व प्रकारच्या परिस्थितींसाठी तयारी केली आहे आणि अशा परिस्थितीत मानसिक कणखरता, दीर्घकाळ फलंदाजी करणे आणि योग्य टप्प्यावर गोलंदाजी करणे अत्यंत महत्त्वाचे ठरेल.
Comments are closed.