IND vs SL: भारतीय संघात दीर्घ प्रतीक्षेनंतर संधी मिळाल्यावर औकिब नबीने सोडलं मौन! नेमकं काय म्हणाला?

श्रीलंकाविरुद्ध खेळल्या (India vs Srilanka) जाणाऱ्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात औकिब नबीला (Aqib Nabi) संधी मिळाली आहे. सुरुवातीला त्याला दुर्लक्षित करण्यात आले होते, पण नंतर जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडला. त्यानंतर औकिबचा भारतीय संघात समावेश करण्यात आला.

रणजी ट्रॉफीमध्ये सलग उत्कृष्ट कामगिरी करूनही भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी त्याला बरीच प्रतीक्षा करावी लागली. आता औकिबने त्याच्या निवडीवर आपले मौन सोडले आहे.

औकिब देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने दमदार कामगिरी करत आहे. गेल्या 2 वर्षांत त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये 104 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच, गेल्या रणजी हंगामात त्याने जम्मू-काश्मीरसाठी 60 विकेट्स घेत संघाला पहिल्यांदाच चॅम्पियन बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. तरीही त्याला भारतीय संघात सामील होण्यासाठी मोठी प्रतीक्षा करावी लागली.

पण, औकिबला पूर्ण आत्मविश्वास होता की, आज नाही तर उद्या आपली भारतीय संघात निवड होईलच. म्हणूनच तो सतत आपल्या कामगिरीवर लक्ष केंद्रित करत होता. भारतीय संघ निवडीबाबत औकिब म्हणाला, आज असो वा उद्या, मी भारतीय संघात नक्कीच सामील होईन, कारण तुम्ही इतकी वर्षे चांगली कामगिरी करत असाल, तर तुम्हाला तुमच्या कष्टाचे फळ नक्कीच मिळते.

गोलंदाजी करतानाही माझी हीच विचारसरणी होती. माझे काम विकेट घेणे आहे, बाकी सर्व देवाच्या इच्छेवर अवलंबून आहे. जेव्हा कधी मला बोलावणे येते, तेव्हा मला खूप आनंद होतो. माझे कुटुंबीय खूश आहेत. मला यापेक्षा आणखी काय हवं आहे.

बीसीसीआयने पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये तो पुढे म्हणाला की, एक क्रिकेटपटू म्हणून तुमची मानसिकता अशी असली पाहिजे की तुमचे काम चांगली कामगिरी करणे आहे. चांगली कामगिरी केल्यानंतर बाकीचे लोक तुमच्याकडे लक्ष देतील.

त्याला पूर्ण खात्री होती की, भारतीय संघात नक्कीच संधी मिळेन. औकिब हा भारतीय कसोटी संघात स्थान मिळवणारा जम्मू-काश्मीरचा पहिला क्रिकेटपटू ठरला आहे.

Comments are closed.