छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या तिघांना अटक
रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याजवळ विटंबना केल्याप्रकरणी तीन संशयितांना शहर पोलिसांनी अटक केली. ही धक्कादायक घटना बुधवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
साजन फर्जान शेख (२६), समीर शेख (२६), करीम शेख (२३, सर्व मुळ रा. पश्चिम बंगाल सध्या कोकणनगर, रत्नागिरी) अशी अटक करण्यात आलेल्या तीन संशयितांची नावे आहेत. घटना उघडकीस आल्यानंतर हिंदू संघटनांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. बुधवारी रात्री तीन समाजकंटक मारुती मंदिर येथील शिवरायांच्या पुतळ्याजवळील लोखंडी जिन्यावर चढून घोड्यावर हात ठेवून फोटो काढत असल्याचे तेथील नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यातील काही नागरिकांनी त्यांना हटकले असता ते तिघेही दारुच्या नशेत असल्याचे निदर्शनास आले. नागरिकांनी त्यांना हटकताच त्यातील करीम शेखने पळ काढला, पंरतु, साजन शेख आणि समीर शेख या दोघांना नागरिकांनी पकडले. नागरिकांनी तातडीने शहर पोलिसांना याबाबत माहिती दिल्यानंतर शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांनाही ताब्यात घेतले. आज सकाळी पोलिसांनी तिघेही कोकणनगर येथे कामाला असलेल्या ठिकाणी जाऊन संशयित करीम शेखला अटक केली. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
Comments are closed.