मुंबईची बाईकर रिद्धी ठक्करचा अपघाती मृत्यू, छत्तीसगडमध्ये भरधाव ट्रकने बाईकला उडवले
मुंबईच्या बोरिवली येथील बाईकर तरुणी रिद्धी ठक्कर हिचा छत्तीसगडच्या बालोड येथे एका भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. बस्तरच्या डोंगराळ भागात 20 बाईकर्सच्या समूहाबरोबर पर्यटनासाठी गेलेल्या रिद्धीचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
छत्तीसगडची राजधानी रायपूरपासून हे ठिकाण साधारण 100 किमी अंतरावर आहे. रिद्धीच्या दुचाकीला विरोधी दिशेने येणाऱ्या एका भरधाव ट्रकने उडवले. त्यानंतर ट्रकचालकाने तिथून पळ काढला. पोलिसांकडून आरोपी ट्रक चालकाचा शोध घेतला जात आहे, असे बालोडचे पोलीस अधीक्षक किरण चव्हाण यांनी सांगितले.
या अपघातात रिद्धीच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. ती ज्या ग्रुपबरोबर गेली होती, त्यातील इतर दुचाकीस्वारांनी तत्काळ हेल्पलाईनला फोन करून रुग्णवाहिका मागवली आणि तिला जवळच्या आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. पुढील उपचारासाठी तिला धमतारी जिह्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. रिद्धी ज्या ग्रुपसह गेली होती त्यातील दुचाकीस्वार महाराष्ट्राच्या विविध भागांतून आले होते. काही राज्याबाहेरचेही दुचाकीस्वार यात सामील झाले होते. हे सर्व लोक आपली यात्रा पूर्ण करून रायपूरला परत येत होते.
Comments are closed.