पितांबरीची ४० लाखांची फसवणूक, गूळ पावडर पुरवठ्याच्या नावाखाली चुना लावला
ठाण्यातील प्रसिद्ध पितांबरी प्रोडक्ट्स प्रा.लि. कंपनीला साताऱ्यातील एका पुरवठादार कंपनीने चक्क ४० लाखांचा गंडा घातला आहे. गूळ पावडर पुरवठा करण्याच्या नावाखाली हा चुना लावण्यात आला असून साताऱ्यातील सिनर्जी हायटेक अॅग्रो कंपनीविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पितांबरी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई आणि साताऱ्यातील सिनर्जी हायटेक अॅग्रो कंपनीचे अभिजित इनामदार यांच्यात गूळ पावडर सप्लाय करण्याचा करार झाला. बाजारात ५५ ते ६० रुपये किलोच्या तुलनेत ४५ रुपये किलो दराने पावडर देण्याचे आश्वासन सिनर्जी हायटेकचे इनामदार यांनी प्रभुदेसाई यांना दिले. त्यानुसार रोज २० किलो वजनाच्या १२५ वॅलेक्सचा पुरवठा करण्याचे ठरले.
कंपनीचा ऊस कापणी, वाहतूक कामगार आणि वीज खर्च यासाठी भांडवलाची गरज असल्याचे सांगत इनामदार यांनी पितांबरीकडून ४० लाख रुपयांची आर्थिक मदत मागितली. ही रक्कम पितांबरीने सिनर्जीच्या खात्यात वळती केली, तसा करारही झाला. मात्र त्यानंतर कंपनीकडून गूळ पावडरचा एक किलोही पुरवठा करण्यात आला नाही, अशी तक्रार पितांबरीकडून करण्यात आली आहे.
इनामदार यांचा फोन बंद झाला, त्यामुळे कारखान्यावर जाऊन तपासणी केली असता तो बंद असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे अभिजित इनामदार त्यांचे भागीदार शैलजा मोहिते, रोहिणी माने आणि अनुराधा इनामदार यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Comments are closed.