इडियट आणि अंधभक्त म्हटल्याने राहुल गांधींना नोटीस आली असेल तर हा सरकारचा मूर्खपणा, संजय राऊत यांनी सुनावले
लोकसभेतील विरोधी पक्षनेते संसदेत बोलताना राहुल गांधी यांना इडियट आणि अंधभक्त शब्दांचा वापर केल्याबद्दल लोकसभा सचिवालयाने नोटीस पाठवली आहे. यावरून शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर हल्ला चढवला आहे. इंडियट हा काय असंसदीय शब्द नाही. इडियट आणि अंधभक्त म्हटल्याने राहुल गांधींना नोटीस आली असेल तर हा सरकारचा मूर्खपणा, अशी टीका संजय राऊत यांनी रविवारी सकाळी मुंबईत माध्यमांशी बोलताना केली.
मूर्ख म्हणणे हे काय असंसदीय नाही. मूर्खाच्या नंदनवनात फिरतोय का? तू मूर्ख आहेस का? असे शब्द आपण वापरतो. जे मूर्ख आहेत त्यांनाच हे शब्द लागतात. राहुल गांधी यांना अंधभक्त, इडियट म्हटल्याबद्दल नोटीस आली असेल तर हा सरकारचा मूर्खपणा आहे. संसदेचा म्हणणार नाही, पण ज्या सरकारच्या ताब्यात ही संसद आहे त्यांचा हा मूर्खपणा आहे. अमित शहा संसदेत येत नाहीत, प्रश्नांची उत्तरं देत नाहीत, पळून जाता. देशाचा गृहमंत्री जेव्हा पळून जातो तेव्हा त्याला काय म्हणायचे? त्याला शौर्यचक्र द्यायचे की परमवीर चक्र द्यायचे? असा सवालही संजय राऊत यांनी केला.
राहुल गांधी यांना लोकसभा सचिवालयाची नोटीस, अमित शहा यांना इडियट आणि अंधभक्त म्हटले
राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून यात ते कितवा स्वातंत्र्यदिन आहे असे बाजुला उभ्या असलेल्या लोकांना विचारत असल्याचे दिसते. यावरून संजय राऊत यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. या लोकांना इडियट का म्हणतात, हे तुम्ही रोज पाहताय. लाल किल्ल्यावर पंतप्रधानांचे टेलिप्रॉम्प्टर बंद झाले. टेलिप्रॉम्प्टर बंद झाल्यावर राष्ट्राला उद्देशून भाषण करताना जो पंतप्रधान अडखळतो, लटपटतो, घाम फुटतो त्याच्या विषयी काय बोलायचे. ज्या मंत्र्याला कितवा स्वातंत्र्यदिन आहे हे विचारावे लागते, त्यांचा स्वातंत्र्यांशी संबंध काय? मूर्खाला मूर्ख म्हणणे लोकशाहीमध्ये गुन्हा आहे का? असा सवालही संजय राऊत यांनी केला. तसेच ते कुंभमेळामंत्री असून महाराष्ट्रात आणि देशात सगळे इडियट लोक एकत्र आणून सरकार चालवले जात आहे. हे सगळे इडियट कॅबिनेट आहे, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.
वंदे मातरम् याची सहा कडवी असून पंतप्रधानांनी टेलिप्रॉम्प्टरशिवाय ती सहा कडवी म्हणून दाखवावी. देवेंद्र फडणवीस यांनीही सहा कडवी समोर उभे राहून म्हणून दाखवावी. 1937 साली काँग्रेसने वंदे मातरम् हे राष्ट्रगान म्हणून स्वीकारले. काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये प्रथम रवींद्रनाथ टागोर यांनी वंदे मातरम् गायले, संघाच्या शिबिरात नाही. इन्कलाब जिंदाबाद आणि वंदे मातरम् ही दोन महाकाव्य आहेत. त्यातले फक्त वंदे मातरम् याचीच गर्जना करत क्रांतीकारक फासावर गेले. वंदे मातरम् आणि इन्कलाब जिंदाबाद म्हणत भगतसिंह, सुखदेव फासावर गेले. भाजपच्या लोकांना इडियट म्हटले जाते ते यामुळेच, असा टोलाही संजय राऊत यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना लगावला.
दरम्यान, बार काऊंसिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मनन कुमार मिश्रा यांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली आहे. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, 12 वर्षांपासून हा माणूस बार काऊंसिल ऑफ इंडियाचा अध्यक्ष आहे. निवडणूक नाही, काही नाही. त्याच्या विषयी माझ्याकडे भरपूर माहिती असून आता त्याला भाजपने राज्यसभेत आणले आहे. तो अंधभक्त आहे. डॉक्टर, वकील जर अंधभक्त व्हायला लागले, तर पेशंट आणि क्लायंट मरून जातील, असे संजय राऊत म्हणाले.
Comments are closed.