कालसर्प दोष निवारण ते भीती दूर… नागपंचमीच्या पूजेचे विशेष फायदे





नागपंचमीचा सण हा श्रावण शुक्ल पंचमीला साजरा केला जातो. यादिवशी नागाची पूजा केली जाते. गावाकडे तर अजूनही नागाच्या वारुळावर जाऊन प्रत्यक्ष नागाची पूजा देखील केली जाते. मात्र शहरात नागाच्या पूजेवर बंदी असल्याने महिला घरातच पाटावर नागाची आकृती बनवून किंवा फोटोची पूजा करतात. आजच्या लेखात नागपंचमीच्या पूजेचे विशेष फायदे यावर एक नजर टाकूया…

नागपंचमीच्या पूजेचे फायदे

नागपंचमीच्या दिवशी सुहासिनी नागदेवतेची पूजा करतात आणि नागाला दूध अर्पण करतात. ज्यामुळे घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते, अशी मान्यता आहे. इतकेच नव्हे तर नागाची मनोभावे पूजा केल्यास एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीतील कालसर्प दोष निवारण होते. मान्यतेनुसार, एखाद्याला स्वप्नात साप दिसत असेल किंवा तो सापांना घाबरत असेल तर या दिवशी पूजा केल्याने भीती दूर होते. याशिवाय नागदेवता आपल्या कुटुंबाचे रक्षण करतात, असेही मानले जाते.

हेही वाचा – नाग पंचमी ते अजगर महोत्सव, सापांचे सण

नागाची पूजा का करता?

नागपंचमीला नागाची पूजा करण्यामागे एक पौराणिक कथा सांगितली जाते. जी सुमंतु मुनींनी राजा शतानिकला सांगितली होती. त्यानुसार, श्रावण शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी नागलोकात मोठा उत्सव असतो. त्यामुळे पंचमीच्या दिवशी जी व्यक्ती सापांना गाईच्या दुधाने आंघोळ घालते त्याच्या कुटुंबाला सर्पदेवता संरक्षण देतात. इतकेच नव्हे तर त्या कुटुंबाला कालसर्प दोषापासून मुक्ती मिळते, असेही मानले जाते.

तसेच महाभारतात जनमेजयाच्या नाग यज्ञाचीदेखील एक कथा सांगण्यात आली आहे. या कथेनुसार, जनमेजय हा कुरु वंशाचा राजा होता, जो अर्जुनाचा नातू आणि परीक्षित राजाचा मुलगा होता. त्याचे वडील राजा परीक्षित यांचा मृत्यू तक्षक नावाच्या नागाने केलेल्या दंशामुळे झाला होता. पितृवधाचा बदला घेण्यासाठी जनमेजयाने सर्प यज्ञ केला. हा यज्ञ, तक्षक आणि इतर सर्पांना नष्ट करण्यासाठी करण्यात आला होता. ज्यामध्ये अनेक साप जळून भस्म झाले. हा यज्ञ चालू असताना आस्तिक मुनी आले आणि त्यांनी जनमेजयाला हा यज्ञ थांबवण्याची विनंती केली आणि त्याचे दुष्परिणाम सांगितले. आस्तिक मुनींच्या उपदेशाने जनमेजयाने यज्ञ थांबवला आणि तक्षक नागासह इतर सर्पांना जीवदान दिले. त्या दिवशी पंचमी तिथी होती आणि म्हणून या दिवसाला नागपंचमी म्हटले जाते.

हेही वाचा – Nag Panchami 2026 : जाणून घ्या तारीख, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी



Comments are closed.