सरकारी घोळ सुरूच… कारकुनाच्या नोकरीसाठीही फरफट; हायकोर्ट लिपिक पदाच्या परीक्षेत गोंधळ, सर्व्हर डाऊन, संगणक बंद, की-बोर्ड चालेना

नीट’ पेपरफुटीवरून देशभरात रणकंदन झाल्यानंतरही परीक्षांमधील सरकारी घोळ सुरूच आहे. साध्या कारकुनाच्या नोकरीसाठीही तरुणांची फरपट होत आहे. उच्च न्यायालयातील लिपिक पदासाठी राज्यात आज विविध ठिकाणी झालेल्या ऑनलाइन परीक्षेत प्रचंड मोठा गोंधळ झाला. कुठे सर्व्हर डाऊन, कुठे संगणक बंद तर कुठे की-बोर्डच चालत नव्हते. त्यामुळे संतापलेल्या विद्यार्थ्यांनी छत्रपती संभाजीनगर, नांदेड, कल्याण, भंडारा, गडचिरोली येथील परीक्षा केंद्रांबाहेर जोरदार आंदोलन केले. त्यामुळे प्रशासनाची पळापळ झाली.

छत्रपती संभाजीनगरमध्ये बाईट झेड इन्पह्टेक केंद्रावर ऑनलाइन परीक्षा ठेवण्यात आली होती. या परीक्षेसाठी 2900 उमेदवार बीड, अंबाजोगाई, अमरावती येथून आले होते. मात्र, तांत्रिक बिघाडामुळे अवघ्या दहा मिनिटांत सर्व्हर डाऊन झाला. संगणक बंद पडले. की-बोर्ड चालत नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे संतापलेल्या उमेदवारांनी परीक्षा केंद्राबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले. लिपिकपदाच्या ऑनलाइन परीक्षेचा पेपर फुटला असून, मोबाईलवर परीक्षापूर्वीच पेपर (परिच्छेद) आल्याचा आरोप काही उमेदवारांनी केला.

खराब सिस्टीममुळे शून्य गुण

तांत्रिक बिघाडाचा सर्वात मोठा फटका काही गुणवंत उमेदवारांना बसला. गेल्या सहा महिन्यांपासून दिवस-रात्र एक करून ते टायपिंगचा सराव करत होते. घरी किंवा खासगी इन्स्टिटय़ूटमध्ये सराव करताना ज्यांना 20 पैकी 16, 17, 18 आणि 19 गुण मिळत होते, त्यांना केंद्रावरील खराब सिस्टीममुळे थेट शून्य गुण मिळाले. पहिल्या बॅचमधील 140 विद्यार्थ्यांपैकी अवघे 1 ते 2 विद्यार्थी पास होऊ शकले. कारण केवळ त्यांच्याच सिस्टीममध्ये थोडीफार हालचाल होत होती. उर्वरित संपूर्ण बॅच तांत्रिक चुकीमुळे नापास झाली.

अडचणींचा डोंगर आणि घालमेल

  • टायपिंगसाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले की-बोर्ड अत्यंत खराब आणि कडक दर्जाचे होते. की-बोर्डस्ची बटणे दाबल्यानंतरही स्क्रीनवर टाईप होत नव्हते.
  • परीक्षा सुरू असतानाच मुख्य सॉफ्टवेअर आणि सिस्टम अचानक बंद पडत होती. उमेदवारांचे लॉगइन आयडी आपोआप लॉगआऊट होत असल्यामुळे स्क्रीनवर टाइप केलेला मजकूर आणि वेळ दोन्ही वाया गेले.
  • अनेक कॉम्प्युटरच्या स्क्रीन व्यवस्थित दिसत नव्हत्या. स्क्रीनवरील फॉन्ट आणि मजकूर धूसर असल्यामुळे टायपिंग करताना प्रचंड त्रास सहन करावा लागला.
  • पेंद्रावरील सर्व्हर आणि तांत्रिक व्यवस्था पूर्णपणे कोलमडलेली होती.
  • परीक्षेदरम्यान येणाऱया तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी तिथे कोणतीही सक्षम तांत्रिक टीम हजर नव्हती.

कल्याणमध्ये न्यायाधीशच परीक्षा केंद्रावर

कल्याणमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील परीक्षा केंद्रावर 500 परीक्षार्थींची परीक्षा तीन बॅचमध्ये घेण्यात येणार होती. मात्र परीक्षा सुरू होताच अनेक तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. परीक्षा पेंद्रावरील सर्व्ह डाऊन झाला. काही परीक्षा खोल्यांमध्ये वीज नक्हती, तर काही संगणकांचे की-बोर्ड काम करत नव्हते. निकालाची प्रिंटही मिळत नसल्याने परीक्षार्थींमध्ये संभ्रम निर्माण झाला. पहिल्या बॅचमधील विद्यार्थी परीक्षा कक्षात गेल्यानंतर बराच वेळ बाहेर न आल्याने दुसऱया आणि तिसऱया बॅचमधील उमेदवारांना ताटकळत राहावे लागले. परीक्षा केंद्रावरील वाढता गोंधळ आणि विद्यार्थ्यांचा संताप लक्षात घेता पोलिसांना पाचारण करण्यात आले. कल्याण न्यायालयातील न्यायाधीशांनाही परीक्षा पेंद्रावर बोलावण्यात आले. विद्यार्थ्यांनी परीक्षा आयोजनातील त्रुटी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. परीक्षा रद्द करून नव्याने घेण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली. रात्री उशिरापर्यंत परीक्षार्थी केंद्राबाहेर ठिय्या देऊन होते. काही विद्यार्थ्यांनी अभिजित दीपके यांना व्हिडीओ कॉल करून गोंधळाची माहिती दिली. त्यांनी विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शवला.

नांदेडमध्ये संगणक बंद

नांदेड येथील छत्रपती चौकातील ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळाच्या केंद्रावर परीक्षा घेण्यात आली. मात्र तिथे आलेल्या साडेचारशे विद्यार्थ्यांसाठी केंद्रावर कुठलीही सुविधा उपलब्ध नव्हती. माऊस व्यवस्थित काम करत नव्हते, सर्व्हर अनेक ठिकाणी डाऊन झाले होते, संगणकाची सिस्टीम वेळोवेळी हँग होत होती. त्यामुळे विद्यार्थ्यांत प्रचंड गोंधळ निर्माण झाला. केंद्र चालक व परीक्षा नियंत्रकांनी याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करून सरकारचा निषेध केला. पुन्हा परीक्षा घ्या, अशी मागणी त्यांनी केली.

लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे

परीक्षा केेंद्रांवर गोंधळ सुरू झाल्यामुळे पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांनी मध्यस्थी करत हायकोर्ट प्रशासनासोबत चर्चा केली. प्रशासनाने परीक्षा देणाऱया उमेदवारांच्या तक्रारी ऐकून घेतल्या असून हे प्रकरण उच्च न्यायालयाकडे पाठवले आहे. यावर उच्च न्यायालय निर्णय घेणार आहे, परंतु अभिजीत दीपके यांनी लेखी स्वरूपात म्हणणे सादर करण्याची मागणी केली. रात्री उशिरा लेखी पत्र मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

कल्याणात न्यायाधीशांची गाडी अडवली

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील परीक्षा केंद्रावर परीक्षार्थी संतप्त झाले. त्यांनी कल्याण सत्र न्यायालयाचे न्यायाधीश परविन सय्यद यांची गाडी अडवली. दोन तास न्यायाधीशांची गाडी परीक्षार्थ्यांनी रोखून धरली. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर परिस्थिती नियंत्रणात आली.

Comments are closed.