युवकांतील असंतोष ही मोदी सरकारच्या शेवटाची सुरुवात! पृथ्वीराज चव्हाण यांचा हल्लाबोल
‘विद्यार्थ्यांच्या आंदोलनांवर झालेली दडपशाही, बेरोजगारीचे वाढते संकट आणि सरकारच्या धोरणांबाबत युवकांमध्ये निर्माण झालेला असंतोष आता व्यापक स्वरूप घेत आहे. हा असंतोष केवळ आंदोलनांपुरता मर्यादित राहणार नसून, त्याचे राजकीय परिणाम आगामी काळात दिसून येतील. युवकांतील असंतोष ही मोदी सरकारच्या शेवटाची सुरुवात आहे,’ असा हल्लाबोल माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
‘विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान सरकारने मोठ्या प्रमाणात अत्याचार केले. विद्यार्थ्यांना देशद्रोही ठरवण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे देशातील युवावर्गामध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. हा असंतोष आगामी काळात सत्ताबदलाचे कारण ठरू शकतो,’ असा दावा त्यांनी केला. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नामदेवराव पाटील उपस्थित होते.
‘सरकारकडून स्टार्टअप, गुंतवणूक आणि ‘विकसित भारत’ अशा घोषणा केल्या जात आहेत. मात्र, भविष्यात रोजगाराच्या संधी किती उपलब्ध होतील, याचा सरकारने गांभीर्याने विचार केला आहे का?’ असा सवाल चव्हाण यांनी केला. ते म्हणाले, ‘कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे (एआय) माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासह वकिली, पत्रकारिता आणि अन्य अनेक क्षेत्रांतील रोजगाराच्या स्वरूपात मोठे बदल होणार आहेत. युवकांसाठी सरकारकडे ठोस दिशा नाही. परीक्षाही सरकारला सुरळीत घेता येत नसतील, तर युवकांनी सरकारवर विश्वास कसा ठेवायचा? आंदोलनादरम्यान गोळीबार, अश्रुधुराचा वापर आणि लाठीहल्ल्याचे आदेश कोणी दिले? याचे उत्तर सरकारने द्यावे,’ अशी मागणी त्यांनी केली.
मुंडेंना काँग्रेसमध्ये घेण्याचा प्रयत्न माझी चूक ठरली
विजय वडेट्टीवार यांनी पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिल्याच्या मुद्द्यावर बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी गोपीनाथ मुंडे यांच्याबाबतचा किस्सा सांगितला. ते म्हणाले, ‘मुख्यमंत्री असताना गोपीनाथ मुंडे यांना काँग्रेसमध्ये घेण्याचा आपण प्रयत्न केला होता. याबाबत तत्कालीन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करून तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेतली होती. मात्र, मंत्रिमंडळाच्या निर्णयाचे अधिकार पंतप्रधानांकडे असतात. त्यांच्याशी आधी चर्चा न करता आपण पुढाकार घेतल्याने मनमोहन सिंग नाराज झाले. विरोधी पक्षातील प्रमुख नेत्याला काँग्रेसमध्ये घेऊन मंत्रिपद देणे म्हणजे आमिष दाखवल्यासारखे होईल, ही चूक मी करणार नाही, अशी भूमिका मनमोहन सिंग यांनी घेतली. त्यानंतर गोपीनाथ मुंडे यांची भेट घेऊन हा प्रस्ताव शक्य नसल्याचे सांगितले.’ ही आपल्या राजकीय कारकिर्दीतील मोठी चूक असल्याचे चव्हाण यांनी नमूद केले.
Comments are closed.