मराठवाड्यातील पन्नास लाख हेक्टर वरील खरीप संकटात, चार दिवसात पाऊस न झाल्यास फक्त धुराळा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मराठवाडा यंदा अल निनामुळे मोठ्या अस्मानी संकटात सापडला आहे. मान्सूनचे अडीच महिने सरले तरी शेतीला पुरक पाऊस पडला नाही. सुरवातीला पावसाने दमदार हजेरी लावल्याने खरीपाच्या पेरण्या झाल्या. शेतीची मशागतही वेळीच पूर्ण झाली. सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने पिके बहरली, वाढीला लागली. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारली. गेल्या 75 दिवसांच्या या कालावधीत एकदाही समाधानकारक पाऊस झाला नाही. पावसाचे पाणी शेतातून बाहेर पडलेच नाही, तरीही खरीप कसबसा तरला मात्र आता परिस्थिती गंभीर झाली आहे.

मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात भयान परिस्थिती आहे. पन्नास लाख हेक्टरवरील खरीप हंगाम आता धोक्यात आला आहे. पंचवीस लाख हेक्टरवरील सोयाबीन शेवटच्या घटका मोजत आहे, चार दिवसात पाऊस नाही झाला तर सोयाबीन पिकाचा धुराळा उडणार आहे. सोयाबीनला फुले लागत आहे. झाडाचे पोषण न झाल्याने लागलेली फुले गळू लागली आहेत. शेंगा लागण्याचे प्रमाण नाममात्र आहे. अशीच परिस्थिती मराठवाड्यातील दहा लाख हेक्टरवरील कापूस अन् पाच लाख हेक्टरवरील तुरीची आहे. परिस्थिती चिंताजनक झाली आहे. शेतकर्‍यांमध्ये आता भीतीचे अन् चिंतेचे वातावरण पसरले आहे. खिशात जेवढे होते ते खरीप पेरणीत खर्च झाले. पीक पदरात पडले नाही तर वर्षभर काय खायचे या चिंतेने शेतकर्‍यांची झोप उडाली आहे.

जनावरांसाठी चारा कोठून आणायचा?

बैलपोळा आता जवळ आलाय. पाऊस नसल्यामुळे चारा प्रश्न निर्माण झाला आहे. तळहाताच्या फोडाप्रमाणे जीवापाड सांभाळलेली जनावरे कशी पोसायची ही चिंता सातावत आहे. पाऊस नसल्यामुळे हिरवा चारा वाढलाच नाही. भविष्यात चारा कोठून आणायचा ही भीती घर करत आहे.

अस्मानी अन् सुलतानी संकट

पीक विमा कंपन्यांनी दरवर्षी शेतकर्‍यांना फसवण्याचे काम केले. एवढ्या अटी आणि शर्थी लादल्याने अतिवृष्टी, भीषण दुष्काळातही शेतकर्‍यांच्या हातात काही पडू दिले नाही. पीक विमा कंपन्यावर शेतकर्‍यांचा विश्वास राहिला नाही. यंदा पीक विमा बहुतांश शेतकर्‍यांनी काढला नसल्यामुळे विमा कंपनीकडूनही काही मिळण्याची शक्यता नाही.

Comments are closed.