महाराष्ट्राच्या मतदार यादीतून 2 कोटी नावे वगळली, रोहित पवार यांनी घेतली मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांची भेट

महाराष्ट्राच्या मतदार यादीतून तब्बल 2 कोटी नावे वगळण्यात आली आहेत, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. मतदारांची माहिती उपलब्ध न झाल्याने ही नावे वगळण्यात आल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले. राज्यातील 7 कोटी 70 लाख मतदारांची संपूर्ण माहिती निवडणूक आयोगाकडे उपलब्ध झाली असून, त्यातील पात्र मतदारांची स्वतंत्र यादी तयार केली जाणार आहे. तसेच अपूर्ण माहिती असलेले आणि नावात बदल असलेले मतदार यांचीही स्वतंत्र यादी तयार केली जाणार असल्याने वगळण्यात आलेल्या मतदारांचा 2 कोटींचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले.

रोहित पवार यांनी निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षणाच्या (SIR) प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले.

रोहित पवार म्हणाले की, मतदार यादीतून 2 कोटी नावे कोणत्या आधारावर वगळण्यात आली, याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांकडे मागण्यात आली. त्यावर 34 लाख मतदारांचा मृत्यू झालेला आहे, 76 लाख मतदारांच्या घरी तपासणीसाठी गेले असता कोणीही आढळले नाही, तर 77 लाख मतदार कायमस्वरूपी दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित झाले आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय सुमारे 2 लाख मतदारांनी माहिती देण्यास नकार दिल्याचेही सांगण्यात आले.

मृत म्हणून नोंद झालेल्या मतदारांपैकी एखादा मतदार प्रत्यक्षात जिवंत असल्याचे आढळल्यास त्याला पुन्हा मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी Form 6 भरता येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितल्याचे रोहित पवार यांनी नमूद केले. घरात आढळून न आलेल्या मतदारांनाही Form 6 भरता येणार आहे. त्यामुळे मतदार यादीच्या शुद्धीकरणासाठी नावे वगळण्यात आली असली, तरी पुढील प्रक्रियेत यापैकी काही नावे पुन्हा मतदार यादीत समाविष्ट होऊ शकतात, असे त्यांनी सांगितले.

मात्र, वगळण्यात आलेल्या 2 कोटी नावांबाबत निवडणूक अधिकाऱ्यांकडून स्पष्ट उत्तरे मिळाली नसल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला. काही वगळलेली नावे पुन्हा मतदार यादीत घेतली जाऊ शकतात, असे अधिकाऱ्यांनी सांगितल्याचा दावाही त्यांनी केला.

भाजपकडून सॉफ्टवेअर तयार केल्याचा आरोप

मतदार यादीच्या प्रक्रियेदरम्यान भाजपकडून एक सॉफ्टवेअर तयार करण्यात आल्याचा गंभीर आरोपही रोहित पवार यांनी केला. या सॉफ्टवेअरमध्ये मतदारांचे ‘आपल्या विचारधारेचे’, ‘संदिग्ध’ आणि ‘विरोधी’ अशा 3 श्रेणींमध्ये वर्गीकरण करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.

राज्यात गेल्या सुमारे 3 ते 3.5 महिन्यांपासून SIRचे काम सुरू असल्याचे सांगताना रोहित पवार यांनी या प्रक्रियेचा मोठा भार बूथ लेव्हल ऑफिसर अर्थात BLO यांच्यावर टाकण्यात आल्याचे म्हटले. BLO म्हणून शिक्षक, ग्राम अधिकारी आणि इतर शासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना कोणत्याही परिस्थितीत 100% मतदारांची छाननी पूर्ण करण्याचे लक्ष्य देण्यात आले आहे. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणातील कामासाठी हे लक्ष्य पूर्ण करणे प्रत्यक्षात शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले.

यामुळे काही ठिकाणी BLO पक्षाच्या कार्यालयात बसून ‘टेबल सर्व्हे’ करत असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला. या टेबल सर्व्हेसाठी भाजप कार्यकर्त्यांकडून माहिती पुरवली जात असल्याचेही त्यांनी सांगितले. पुणे, नाशिक आणि ठाणे येथे अशा प्रकारच्या घटना समोर आल्याचा दावा त्यांनी केला. या प्रकरणांवर कारवाई करण्याचे आश्वासन निवडणूक अधिकाऱ्यांनी दिल्याचे रोहित पवार यांनी सांगितले.

‘भाजप राजकीय विरोधकांची नावे वगळण्याचा प्रयत्न करत आहे’

या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून भाजप BLOच्या मदतीने आपल्या राजकीय विरोधकांची नावे मतदार यादीतून वगळण्याचे काम करत असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला.

एका महिला पत्रकाराचे नाव मतदार यादीतून वगळण्यात आल्याचे उदाहरण देत त्यांनी सांगितले की, संबंधित पत्रकाराने अधिकाऱ्यांकडे याबाबत जाब विचारला. त्यावेळी अधिकाऱ्यांनी व्हॉट्सअॅपवर आधार कार्ड पाठवण्यास सांगितले आणि त्यानंतर तिची नोंदणी पुन्हा करण्यात आली.

“ती पत्रकार असल्याने आणि तिने आवाज उठवल्याने तिचे नाव पुन्हा नोंदवण्यात आले. मात्र, भाजपच्या दबावाखाली अशा पद्धतीने किती जणांची नावे पुन्हा नोंदवण्यात आली आहेत?” असा सवाल रोहित पवार यांनी केला.

Comments are closed.