Vasai News – नालासोपाऱ्यात पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन; 36 लाखांचे कोकेन जप्त, नायजेरियन नागरिकाला अटक
वसई विरार शहरात अमली पदार्थ तस्करीचे प्रमाण वाढू लागले आहे. याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी शनिवारी रात्रीच्या सुमारास नालासोपाऱ्याच्या प्रगतीनगर मध्ये कोम्बिग ऑपरेशन केले. या कारवाईत एका नाजयेरियन नागरिकाकडून 72 ग्रॅम कोकेन जप्त केले आहे. त्याची किंमत 36 लाख 50 हजार रुपये इतकी आहे.
नालासोपारा पूर्वेच्या प्रगतीनगर आणि मोरेगाव परिसरात मोठ्या प्रमाणावर नायजेरियन नागरिक बेकायदेशीररित्या रहात आहेत. ते अमली पदार्थांच्या व्यवहारात सक्रीय असल्याचे विविध कारवाया मधून समोर येत आहे. शनिवारी रात्री परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त अशोक विरकर यांच्या नेतृत्वाखाली पोलिासंनी या परिसरात कोम्बिंग ऑपरेशन केले. या कारवाईसाठी पोलिसांची 10 पथके तयार करण्यात आली होती.
पोलिसांनी मोरेगाव परिसराला वेढा घातला आणि संशयित नायजेरियन नागरिकांच्या घराची तपासणी केली. यावेळी बसेरा इमारतीत राहणाऱ्या एका नायजेरियन नागरिकाकडे 72 ग्रॅम कोकेन नावाचा अमली पदार्थ सापडला. त्याची किंमत 36 लाख 50 हजार रुपये आहे. या नागरिकाला अटक करण्यात आली असून चुवा अमेका ओग्बोना मायकल असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्या विरोधात अमली पदार्थ विरोधी कायद्याच्या कलमाअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील महिन्यात मोरेगाव आणि प्रगती नगर या परिसरात पोलिसांनी केलेल्या दोन वेगवेगळ्या कारवाईत 5 कोटींचे एमडी हे अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते.
Comments are closed.