हा तर भ्रष्टाचाराचा जामनेर पॅटर्न; नाशिकची दुरावस्था आणि बनावट टेंडरवरून संजय राऊत यांचा जोरदार हल्लाबोल
नाशिकमध्ये होणाऱ्या आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर बनावट टेंडर बनावट वर्क ऑर्डर चे प्रकरण सध्या गाजत आहे. असे असतानाच नाशिकमधील खड्ड्यांच्या प्रश्नावर शिवसेनेकडून आयोजित करण्यात आलेल्या जन आक्रोश मोर्चाच्या निमित्ताने शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना कुंभमेळा बनावट टेंडर प्रकरणी प्रश्न विचारण्यात आले. यावर उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, ”कुंभमेळा टेंडर प्रक्रियेत घोटाळा आहे असे लोकं बोलत आहेत. बोगस टेंडरिंग, बोगस वर्क ऑर्डर निघतायत. हा भ्रष्टाचाराचा जामनेर पॅटर्न आहे आणि तो देवेंद्र फडणवीसांनीच महाराष्ट्रात आणलाय”, अशी जळजळीत टीका केली.
”इथल्या ज्या मंत्र्यांना कुंभमेळा मंत्री म्हणतात खरंतर त्यांना कुंभकर्ण मंत्री म्हटले पाहिजे. हे सरकारच कुंभकर्णाच्या भूमिकेत आहे. देवेंद्र फडणवीस आणि मोदी 2046 च्या विकासाच्या बाता करतायत. इथले रस्ते स्पेस टेक्नॉलॉजीने बनवलेयत असे सांगतात. खड्डे बघितल्यानंतर मला असं वाटतंय की नाशिक हे चंद्रावरचं शहर आहे. पण चंद्रावर गेलेली माणसं देखील सुखरूप परत आली पण इथल्या चंद्रावर माणसं मरत आहेत. लाज वाटत नाही का या लोकांना. किती भ्रष्टाचार आहे महापालिकेत. कुंभमेळ्याचं 15 कोटींचं बजेट 45 कोटींवर गेलं. आधी पंधरा हजार टॉयलेट बांधणार होते आता ते 55 हजार टॉयलेट बांधणार असून त्यातले 10 हजार व्हीआयपी टॉयलेट आहेत. अशा तऱ्हेने टॉयलेटमध्येही पैसे खायचे? कुंभमेळ्याच्या निमित्ताने हे हिंदुत्ववादी टॉयलेटमध्येही पैसे खायला लागले आहेत. ज्या पक्षाने रामंमंदिराची लूट केली, रामाचे अलंकार चोरले, सीतेची मंगळसूत्र चोरली. दानपेट्या चोरल्या. त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार. यांच्याकडून लोकं माफी पण स्वीकारणार नाहीत”, असा घणाघात संजय राऊत यांनी केला.
”हे स्वत:ला महान हिंदुत्ववादी समजतात. त्र्यंबकेश्वरला हजारो लाखो भाविक येणार याची यांना कल्पना नाही. कुठलं प्रशासन यांनी आणून ठेवलं आहे? कुठलं प्रशासन आहे? फडणवीसांनी हे शहर दत्तक घेतलंय ना, तुम्ही बाप आहात ना या शहराचे. मग बापासारखे वागा ना. तुमचा दत्तक मुलगा कुंभमेळ्यात पैसे खातोय. कुठलं दत्तक विधान केलं तुम्ही? हे सरकार, हे प्रशासन मुर्दाड, निर्दयी आहे, त्यांना दिसत नाही का? ७२ नगरसेवकांची डोळ्यांची बुब्बुळ बाहेर आली आहेत का? भाजपचे नगरसेवक खड्ड्यांविरोधात आंदोलन करतायत, ही कुठली नौटंकी, राजीनामा द्या त्या पेक्षा”, असे संजय राऊत म्हणाले.
”लोकं सागतात की आम्ही जेव्हा खड्ड्यांची तक्रार करतो तेव्हा महापालिकेचे अधिकारी धमक्या देतात. मी त्यांना सांगितलंय की अधिकाऱ्यांची नावं सांगा त्यांना खरी गुंडगिरी काय असते ते मी दाखवतो. नाय त्यांना नाशिक सोडून पळायला लावलं तर बघा”, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.
”कुंभमेळा टेंडर प्रक्रियेत घोटाळा आहेच. हे सगळं जामनेर कनेक्शन आहे. हा भ्रष्टाचाराचा जामनेर पॅटर्न फडणवीसांनीच महाराष्ट्रात आणलाय. बोगस टेंडरिंग, बोगस वर्क ऑर्डर. एक महिन्यापूर्वी दहा लाख बोगस नोट्या सापडल्या त्या देखील त्यांच्या असतील असं मला वाटतं. रस्त्याचं सिमेंटीकरण करणं हेच कुंभमेळ्याचं काम आहे का? त्यांना कामं कशी करतात हे पाहिजे असेल तर आम्ही त्यांचं बौद्धिक घेऊ. जे स्वत:ला अतिशहाणे समजतात त्यांचं प्रत्येक काम फक्त कमिशनसाठीच आहे. कमिशन घ्यायचं आणि ठेकेदारांना मोकळं रान द्यायचं”, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
”मुख्यमंत्र्यांकडे भ्रष्टाचाराचे पुरावे देऊन ते काही करतील असं जर वाटत असेल तर मी त्यांना भेटेन. पण या सर्व भ्रष्टाचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना आपल्या खिशात ठेवले आहे. एकेकाळी त्यांचा काय गर्जना होत्या. आता काय झालंय. हे सगळे भ्रष्टाचारी त्यांच्या अवती भवती बसलेले आहेत. थातूर मातूर कारवाया करायच्या. आदिवासींची जी काही अवस्था आहे सध्या. त्यांच्या जमीनी लुटल्या जातायत. आदिवासीच्या मुली सर्पदंशाने मरतायत. थातूर मातूर बोलतात. हाहा हूहू करतात आणि निघून जाता.. याला माज म्हणतात. निर्ढावलेलेपणा म्हणतात. जो केंद्रातून झिरपत झिरपत महाराष्ट्रात आलेला आहे”, अशी जोरदार टीका संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर केली.
”आखाड्याच्या प्रमुख साधूंनी आमच्याशी संपर्क साधला आहे. कुंभमेळ्याची कामं पैसे खाण्यासाठीच काढलेली आहेत, असं त्यांचं म्हणनं आहे. जिथे जिथे भाजपचं राज्य आहे तिथे त्यांनी जनतेची लूट, जनतेच्या खिशात हात घालायचा कार्यक्रम सुरू केला आहे. मुंबई महानगरपालिकेत आम्ही 25 वर्ष सत्तेत होतो. आम्ही 90 हजार कोटींच्या ठेवी ठेवल्या तर यांनी त्या लुटून खाल्ल्या. आता करवाढीच्या नावाखाली जनतेला लुटतायत. सर्व शहरात तेच होतंय. राज्य जनतेला लुटण्यासाठी करतायत का? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
Comments are closed.