जुन्या गाड्यांसाठी 'E-10' योजना सादर करा
केंद्र सरकारच्या मुख्य आर्थिक सल्लागारांची सूचना
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्र सरकारने सर्व पेट्रोल वाहनांसाठी ‘ई-20’ योजना लागू केली आहे. या योजनेच्या अंतर्गत पेट्रोलमध्ये 20 टक्के इतक्या प्रमाणात इथेनॉलचे (मद्यार्क) मिश्रण करुन ते इंधन विकण्यात येत आहे. तथापि, या इंधनामुळे जुन्या कार्समध्ये समस्या निर्माण होत असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे ही योजना सध्या चर्चेचा विषय बनली आहे. केंद्र सरकारने जुन्या कार्ससाठी पूर्वीच्या ‘ई-10’ योजनेचे पुनरुज्जीवन करावे, अशी सूचना केंद्र सरकारचे मुख्य आर्थिक सल्लगार व्ही. अनंत नागेश्वरन यांनी केंद्र सरकारला सोमवारी निवेदनाद्वारे केली आहे.
नव्या कार्समध्ये ई-20 इंधनामुळे कोणतीही समस्या निर्माण होत नाही, असे दिसून आले आहे. त्यामुळे ज्या कार्स ई-20 इंधन योजनेला अनुकूल आहेत, त्याना ई-20 योजना लागू ठेवावी. मात्र, जुन्या गाड्यांसाठी पेट्रोलमध्ये 10 टक्के इथेनॉलच्या मिश्रणाची व्यवस्था असावी, असे नागेश्वरन यांनी स्पष्ट पेले आहे.
वृत्तपत्रातील लेखाद्वारे सूचना
नागेश्वरन यांनी या संदर्भात एका प्रसिद्ध वृत्तपत्रात लेख लिहिला आहे. जुन्या कार्स ई-20 इंधनावर चालविल्यास मायलेज कमी होते. तसेच कार वारंवार दुरुस्त करावी लागते. कारच्या इंजिनचे काही भाग लवकर खराब होतात, अशा तक्रारी येत आहेत. अनेक जुन्या कार्स ई-20 इंधनाला अनुकूल रचनेच्या नाहीत. अशा कार्सच्या चालनांना समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने ‘ई-10’ आणि ‘ई-20’ या दोन्ही योजना लागू कराव्यात. ज्याच्याकडे जुन्या कार्स आहेत, त्यांचीही यामुळे सोय होईल, असे नागेश्वरन यांनी या लेखात मत व्यक्त केले.
योजना लागू रहावी
‘ई-20’ या योजनेमुळे काही जुन्या कार्सना समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, ही वस्तुस्थिती आहे. मात्र, यामुळे पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण करण्याची संपूर्ण योजनाच बंद करा, ही मागणी अतिरेकी आहे. या योजनेमुळे परकीय चलनाची बचत होत आहे. तसेच शेतकऱ्यांचा लाभ होत आहे. त्याचप्रमाणे इथेनॉलच्या मिश्रणामुळे कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी होऊन पर्यावरण सुरक्षेलाही हातभार लागत आहे. त्यामुळे ही योजना स्वीकारार्ह आहे. तथापि, ज्यांना तिचा त्रास होत आहे, त्यांच्यासाठी ई-10 चा पर्याय उपलब्ध असावा, असे त्यांनी सुचविले आहे.
Comments are closed.