ठाणेकरांचा खिसा कापला, मालमत्ता करवाढीला मंजुरी; टीएमटीला मात्र ‘थांबा’

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

ठाणेकरांवर लवकरच मालमत्ता करवाढीचा बोजा पडणार आहे. निवासी मालमत्ता करात १२ तर बिगर निवासी मालमत्ता करामध्ये २० टक्के वाढ होणार असून आज झालेल्या महासभेत याबाबतचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. दहा वर्षांनंतर ठाण्यातील मालमत्ता कर वाढणार असून नागरिकांचा खिसा कापला जाणार आहे. टीएमटीच्या भाडेवाढीचा प्रस्ताव प्रशासनाने आणला होता पण तूर्त तरी या प्रस्तावाला ‘थांबा’ मिळाला आहे. टीएमटीच्या बस प्रवासवाढीवर विचार होणार असल्याने प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

ठाणे महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट झाला असल्याने उत्पन्नवाढीसाठी प्रशासनाने ठाणेकरांवर महागाईची कुऱ्हाड चालवली आहे. आज झालेल्या महासभेत मालमत्ता करवाढीचा प्रस्ताव मंजुरीसाठी पटलावर आला होता. आधीच महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडलेले असताना शिंदे गटाच्या नगरसेवकांनी मालमत्ता करवाढीचे समर्थन केले. ज्या मालमत्तांना अद्याप कर लावण्यात आलेला नाही त्याला कर लावण्यासाठी प्रयत्न करा, असेदेखील शिंदे गटाने प्रशासनाला सांगितले. दरम्यान, महापालिकेचा महसूल वाढला तर विकासकामे करता येतील त्यामुळे करवाढ करा, असे शिंदे गटाच्या नगरसेवकांनी मागणी करताच विरोधकांनी यावर नाराजी व्यक्त केली.

अशी असेल करवाढ

मालमत्ता करात करवाढ सुचविताना निवासी मालमत्तांच्या करात १२ टक्के तर बिगर निवासी मालमत्तांच्या करात तब्बल २० टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. यातून महापालि केने सुमारे १०४.६७ कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल अपेक्षित धरला आहे.

टीएमटीची भाडेवाढ एकसमान असावी

महासभेत टीएमटी भाडेवाढीचा प्रस्तावदेखील मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला होता. परंतु एमएमआर क्षेत्रातील भाडेवाढ ही एकसमान असावी त्यादृष्टीने शासनाकडून प्रस्ताव पुढे आला आहे. त्यामुळेच टीएमटी भाडेवाढीचा प्रस्ताव तूर्तास मागे घेण्यात आल्याचे प्रशासनाने यावेळी सांगितले. त्यामुळे अद्याप तरी टीएमटी भाडेवाढ होणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले

Comments are closed.