रायगड झेडपी शाळेतील विद्यार्थी पटसंख्येला गळती
एकीकडे सरकार विविध योजनांवर कोट्यवधी रुपये खर्च करत असताना शिक्षण क्षेत्राकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
रायगडच्या झेडपी शाळांमधील विद्यार्थी पटसंख्येला गळती लागली असून वर्षभरात ५ हजार ६४२ विद्यार्थ्यांची घट झाली आहे. गेल्या शैक्षणिक वर्षामध्ये रायगड जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये ८३ हजार ९७९ विद्यार्थी होते. आता ही संख्या घटून ७८ हजार ३३१ वर आली आहे. दरम्यान विद्यार्थी संख्या टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान शिक्षण विभागापुढे उभे ठाकले आहे.
– २०२५ – २६ या शैक्षणिक वर्षात ८३,९७९ विद्यार्थी जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेत होते. २०२६ २७ मध्ये ही संख्या ७८,३३१ इतकी झाली आहे. अवघ्या एका शैक्षणिक वर्षात ५,६४२ विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद शाळांमधून कमी झाल्याचे स्पष्ट होत आहे.
– रायगड जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश सुरू असून विद्यार्थी संख्येत आणखी थोडी वाढ होणार असल्याचा दावा शिक्षण विभागाकडून करण्यात आला आहे. पण प्रत्यक्षात मात्र चित्र उलटं दिसून येत आहे.
सुविधा वाढवण्याची गरज
रायगडच्या झेडपी शाळांमधील जिल्हा परिषद शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच पायाभूत सुविधा मजबूत करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. स्वच्छ आणि आकर्षक वर्गखोल्या, डिजिटल शिक्षण, संगणक सुविधा, क्रीडा साहित्य, स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक उपक्रम यावर अधिक भर देणे आवश्यक आहे. त्याचबरोबर जिल्हा परिषद शाळांमध्ये उपलब्ध असलेल्या शासकीय योजनांची आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाची माहिती पालकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवणेही महत्त्वाचे ठरणार आहे.
रायगड जिल्हा परिषदेमार्फत जिल्ह्यात एकूण २ हजार ४७३ शाळा चालवल्या जातात. या शाळांच्या माध्यमातून ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. मात्र गेल्या काही वर्षांपासून पालकांचा कल खासगी शाळांकडे वाढत असल्याने जिल्हा परिषद शाळांच्या पटसंख्येवर त्याचा थेट परिणाम होत आहे. शैक्षणिक सुविधा, इंग्रजी माध्यमाचे आकर्षण, आधुनिक पायाभूत सुविधा, विविध उपक्रम तसेच भविष्यातील स्पर्धात्मक शिक्षणाच्या अपेक्षेमुळे अनेक पालक आपल्या पाल्यांना खासगी शाळांमध्ये दाखल करण्यास प्राधान्य देत आहेत. परिणामी जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होत आहे.
ग्रामीण भागात पूर्वी जिल्हा परिषद शाळा हा शिक्षणाचा प्रमुख आधार होता. मात्र आता गावागावांत खासगी शाळांचे जाळे वाढले आहे, याचा परिणामही जिल्हा परिषद शाळांच्या पटसंख्येवर होत आहे.
Comments are closed.