हातिवले टोलनाका सुरू होण्याच्या हालचाली, स्थानिक नागरिक व वाहतूकदारांना संपूर्ण टोलमाफी द्या; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

पाच वर्षांपूर्वी झालेल्या आंदोलनानंतर ठप्प असलेला मुंबई-गोवा महामार्गावरील राजापूर तालुक्यातील हातिवले टोलनाका पुन्हा कार्यान्वित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. पुढील महिनाअखेरीस हा टोलनाका सुरू होण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने स्थानिक नागरिकांना संपूर्ण टोलमाफी देण्याच्या मागणीने पुन्हा जोर धरला आहे. स्थानिक नागरिक व वाहतूकदारांना टोलमाफी न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा कोंढेतडचे माजी उपसरपंच अरविंद लांजेकर यांनी दिला आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर हातिवले येथे टोलनाका उभारण्यात आला आहे. या टोलनाक्यावरून स्थानिक वाहनांना टोलमाफी मिळावी, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. याच मागणीसाठी सुमारे पाच वर्षांपूर्वी स्थानिक ग्रामस्थांनी महामार्गावर ठिय्या आंदोलन केले होते. त्यानंतर हातिवले टोलनाका सुरू झालेला नाही. तसेच स्थानिकांच्या टोलमाफीबाबतही अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओसरगाव येथील महामार्गावरील टोलनाका सुरू झाल्यानंतर हातिवले टोलनाकाही पुढील महिन्याच्या अखेरीस सुरू होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या स्थानिक वाहनांच्या टोलमाफीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

राजापूर शहरात तालुक्यातील नागरिकांची विविध कामांसाठी दररोज मोठ्या प्रमाणात ये-जा असते. अनेक नागरिकांना दिवसातून अनेक वेळा शहरात येणे-जाणे करावे लागते. हातिवले टोलनाका सुरू झाल्यास अशा वाहनचालकांना वारंवार टोल भरावा लागणार आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडणार असल्याचे सांगत टोलमाफीची मागणी करण्यात येत आहे.याबाबत स्थानिक वाहनचालक व ग्रामस्थांच्या वतीने यापूर्वी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे निवेदनेही देण्यात आली आहेत. मात्र, अद्याप या मागणीवर कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. अशा परिस्थितीत टोलनाका सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्याने स्थानिकांमध्ये नाराजी वाढण्याची शक्यता आहे.

हातिवले टोलनाक्यावरून राजापूर तालुक्यातील स्थानिक ग्रामस्थ, नागरिक तसेच वाहतूकदारांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होणार आहे. त्यामुळे तालुक्यातील स्थानिक वाहनांना संपूर्ण टोलमाफी देण्यात यावी. अन्यथा या मागणीसाठी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा अरविंद लांजेकर यांनी दिला आहे. आता हातिवले टोलनाका सुरू करण्यापूर्वी स्थानिकांच्या टोलमाफीच्या मागणीवर प्रशासन व संबंधित राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण काय निर्णय घेते, याकडे राजापूर तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Comments are closed.