भाजप-बविआने भूमिपूजनाचा नारळ फोडला, पण रस्ता हरवला; अर्नाळाच्या एसटी पाड्यातील रस्त्याच्या चिंधड्या
अर्नाळा विभागातील एसटी पाडा येथील मुख्य रस्त्याची दुरवस्था झाली आहे. भाजप आणि बहुजन विकास आघाडीच्या वतीने यापूर्वी रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करून नारळ फोडला. मात्र प्रत्यक्षात रस्ता झालाच नाही. भाजप-बविआच्या स्टंटबाजीमुळे रस्त्याच्या चिंधड्या उडाल्या असून डांबरीकरण न करताच रस्ता हरवला आहे. त्यामुळे धोकादायक रस्त्यावरून नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
अर्नाळा परिसरातील एसटी पाडा येथील मुख्य रस्ता पूर्णपणे खचला आहे. रस्त्याच्या अक्षरशः चिंधड्या उडाल्या आहेत. खड्डेमय मार्गावरून प्रवास धोकादायक असून दररोज नागरिकांना अपघाताचा धोका पत्करावा लागत आहे. या रस्त्याच्या दुरवस्थेचा सर्वाधिक फटका शाळकरी मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच रुग्णांना बसत आहे. वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना रुग्णालयात नेतानाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी स्थानिक नागरिकांनी वारंवार मागणी करूनही अद्याप प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. विशेष म्हणजे, भाजप आणि बहुजन विकास आघाडीच्या वतीने यापूर्वी रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करून नारळ फोडण्यात आला होता. मात्र भूमिपूजन होऊनही प्रत्यक्षात रस्ता मात्र ‘गायब’ असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
आंदोलनाचा इशारा
गणेशोत्सव व गोकुळाष्टमीसारखे महत्त्वाचे सण जवळ आले असताना रस्त्याची दुरवस्था कायम राहणे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने गंभीर बाब आहे. सणांपूर्वी रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी अन्यथा भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या अर्नाळा शाखेने आंदोलनाचा इशारा दिला आहे
Comments are closed.