१० विकेट्स मिळवूनही मानव सुथार ‘सामनावीर’ का ठरला नाही…

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

पहिल्या कसोटीत यजमान श्रीलंकेला १६५ धावांनी पराभूत करून हिंदुस्थानच्या संघाने मालिकेची दमदार सुरुवात केली. ३७२ धावांच्या आव्हानात्मक लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ हिंदुस्थानी गोलंदाजीसमोर हतबल दिसला आणि दुसऱ्या डावात केवळ २०६ धावांवर गारद झाला. पहिल्या डावात १६७ धावांचे मोठे योगदान देणाऱ्या देवदत्त पडिक्कलला ‘सामनावीर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले; पण युवा फिरकी गोलंदाज मानव सुथारही या सामन्याचा खरा नायक असल्याचे म्हटले जात आहे. कारण त्याने आपल्या फिरकीने सामना पूर्णपणे हिंदुस्थानच्या बाजूने फिरवला.

पडिक्कलने संघाला सावरले…
यशस्वी जैसवाल बाद झाल्यावर देवदत्त फलंदाजीला आला. देवदत्तने काही काळ केएल राहुलबरोबर भागीदारी रचली, पण
काही वेळाने राहुल जायबंदी झाला आणि त्याने मैदान सोडले. तेव्हा देवदत्तने संघाची सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. अन्य हिंदुस्थानच्या फलंदाजांना मोठी खेळी साकारण्यात अपयश येत होते, तिथे देवदत्तने १६७ धावा केल्या. भारताच्या एकूण धावसंख्येपैकी देवदत्तच्या एकतृतीयांश धावा नक्कीच होत्या.

सुथारने १० बळी घेतले
सुथारने सामन्यात एकूण १० बळी घेतले (पहिल्या डावात ४ आणि दुसऱ्या डावात ६). त्याच्या धारदार फिरकी गोलंदाजीसमोर श्रीलंकेचे फलंदाज पूर्णपणे हतबल झाले होते. एकाही फलंदाजाचा त्याच्यासमोर जास्त काळ निभाव लागला नाही. दुसऱ्या डावात श्रीलंकेचे चार फलंदाज आपले खातेही उघडू शकले नाहीत, याला कारण सुथारची गोलंदाजी ठरली. सुथारने २० पैकी १० विकेट्स मिळवत सामनावीर पुरस्कारासाठी आपली दावेदारी सिद्ध केली होती.

देवदत्तला का दिला सामनावीर पुरस्कार…
देवदत्तने संघाच्या विजयाचा पाया रचला तो पहिल्या डावातील १६७ धावांच्या मॅरेथॉन खेळीने. या खेळपट्टीवर फलंदाजी करणे सोपे नव्हते, तिथे त्याने सामन्यात सर्वाधिक धावा केल्या. त्यामुळे त्याला सामनावीर पुरस्कार मिळालाः पण सामन्याला आकार देण्यात डावखुरा फिरकी गोलंदाज मानव सुथारचे योगदानही तितकेच महत्त्वाचे होते. यावेळी देवदत्त आणि मानव यांना हा पुरस्कार विभागून द्यायला हवा होता, अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात सुरू होती.

Comments are closed.