स्पोर्ट्स सिटीकडून – शेवटच्या तीन चालींमध्ये विवानचा 'चेकमेट'
अखेरच्या तीन फेऱ्यांमध्ये सलग तीन विजय… या विजयाने प्रतिस्पर्धी डगमगले आणि विवान विशालने बुद्धिबळाच्या पटावर अशी बाजी पलटवली की, आशियाई ज्युनियर रॅपिडचा मुकुट थेट हिंदुस्थानच्या शिरावर विराजमान झाला. २१४९ रेटिंग असलेल्या विवानने दमदार खेळ करत ७ फेऱ्यांत ६ गुणांची कमाई केली आणि आशियाई ज्युनियर ओपन रॅपिड अजिक्यपदाबर दिमाखात नाव कोरले.
आता क्लासिकल अजिंक्यपदावर हिंदुस्थानने आपली नजर रोखली आहे. विवानच्या या कामगिरीचे आणखी एक वैशिष्टच म्हणजे त्याने अनेक आंतरराष्ट्रीय मास्टर्सना मागे टाकत हा पराक्रम केला आंतरराष्ट्रीय मास्टर अक्षय बोरगावकर आणि अपूर्व कांबळे यांनी प्रत्येकी ५ गुण मिळवले. टायब्रेकमध्ये बाजी मारत अक्षयने रौप्य, तर अपूर्वने कांस्यपदक पटकावले.
राजस्थानच्या क्रीडा स्वप्नांना मुंबईत भरारी
मुंबई: राजस्थानच्या युवा क्रीडापटूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकत रामनारायण रुईया शेखावाटी स्पोर्टस अकादमीची उद्या शुक्रवारी दिमाखदार सोहळ्यात घोषणा केली जाणार आहे.
रामगढ़ शेखावाटी परिषद, मुंबईच्या पुढाकाराने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकारण्यात येत आहे राजस्थानातील युवा खेळाडूंना घडविणे, क्रीडाकौशल्याला व्यासपीठ देणे आणि क्रीडा क्षेत्रात नवे आदर्श निर्माण करणे हे या अकादमीचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या अकादमीची औपचारिक घोषणा महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आशीष शेलार यांच्या उपस्थितीत शुक्रवारी लोअर परळच्या सेंट रेगिस हॉटेलमध्ये होणार आहे. तसेच या सोहळ्याला इंडियन फैंटसी स्पोर्टस फेडरेशनचे सल्लागार अमृत माधुर हेसुद्धा सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित असतील.
Comments are closed.